Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रावरील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका आता आणखी वाढला आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमधील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकीकडे रुग्ण बरे होत आहेत मात्र दुसरीकडे रुग्णांची संख्याही वाढत आहे. प्रशासन त्यांच्याद्वारे जितके शक्य होईल तितके, टेस्टिंग आणि उपचार यावर भर देत आहे, मात्र कधी कधी या प्रक्रियेमधील काही चुकांमुळे जनतेला मनःस्ताप सहन करावा लागत आहे. अशीच घटना ठाण्यात (Thane) घडली आहे. ठाण्यातील थायरोकेअर लॅब (Thyrocare Lab) या आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेत कोव्हीड-19 च्या स्वब तपासणीमध्ये, 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळला आहे. याबाबत अनेक रुग्णांनी तक्रार केली होती.

टीएमसी ट्वीट -

यामुळे आता या प्रयोगशाळेबाबत कडक पावले उचलून, या लॅबला ठाण्यात कोव्हीड-19 ची स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश, मा. महापालिका आयुक्त श्री विजय सिंघल यांनी दिला आहे. ठाणे शहरात कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते. परंतु आता थायरोकेअर प्रयोगशाळेने तब्बल 6 प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल दिला आहे. यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिक त्रासातून जावे लागले होते. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज 2940 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 44582 वर पोहोचली)

त्यामुळे 22 मे 2020 पासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संशयितांसाठी कोरोन व्हायरस स्वॅबगोळा करू नये असे आदेश, ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. कोविड चाचणी बाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. टीएमसीने या खासगी लॅबला जाब विचारण्यासाठी नोटीस पाठविली आहे. उपायुक्त संदीप मालवी यांनी याबाबत, प्रयोगशाळेवर फौजदारी गुन्हा नोंदविला जाऊ शकतो आणि प्रयोगशाळेचा चाचणी परवाना काढून घेतला जाऊ शकतो, असे सांगितले.