पुणे (Pune) जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ‘गिरीवन’ (Girivan) हा हिल स्टेशन प्रकल्प गेल्या काही महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या आधी इथल्या जमिनी बेकायदा असून, त्या शेतकऱ्यांकडून छळवादाने काढून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याबबत योग्य ती चौकशी न केल्याने, जिल्हाधिकारी सौरभ राव यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होता. मात्र आता 'गिरीवन प्रोजेक्ट' बाबत खोटी माहिती देत ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale), अॅड. जयंत रामभाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरुद्ध पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘गिरीवन’वर झालेल्या आरोपांबाबत तीन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे न्यायालयाने सौरभ राव यांना नायालायाचा अवमान केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता गिरीवन हा प्रकल्प शासनमान्य आहे, अशी खोटी माहिती देत ग्राहकांना आकर्षित करून, इथल्या जमिनींची विक्री करण्यात आली आहे. यामध्ये 14 खातेदारांची सुमारे 1 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याची बाब समोर येत आहे. याप्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. (हेही वाचा: अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मराठीत; तब्बल 30 वर्षांनतर 'एबी आणि सीडी' मध्ये विक्रम गोखलेंसोबत साकारणार महत्वाची भूमिका (Photo))
म्हाळगी दाम्पत्याने गिरीवन प्रकल्पाची स्थापना केली होती. या प्रकल्पाचे विक्रम गोखले अध्यक्ष आहेत. म्हाळगी दाम्पत्य वकील असल्याने तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असल्याने लोकांनी विशास ठेऊन या जमिनी खरेदी केल्या. मात्र त्यानंतर ग्राहकांची अनेक प्रकारे फसवणूक करण्यात आल्याची बाबा समोर येत आहे. याबाबत तक्रार नोंदवल्यावर 420, 465, 468, 341, 447, 427 कलमान्वये विक्रम गोखले, अॅड. जयंत रामभाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.