अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले (संग्रहित संपादित प्रतिमा)

1994 साली ‘अक्का’ या मराठी चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पहिल्यांदा दिसून आले होते. बिग बीने एका गाण्यासाठी पत्नी जया बच्चन यांच्यासमवेत या चित्रपटात खास भूमिका साकारली होती आणि यामुळेच या चित्रपटाला चार चांद लागले होते. आता तब्बल 25 वर्षानंतर अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'एबी आणि सीडी' (AB aani CD) हा तांत्रिकदृष्ट्या त्यांचा दुसरा मराठी चित्रपट आहे. परंतु भूमिकेचा विचार केल्यास हा तसा त्यांचा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

AB aani CD Poster -

मुंबईचा प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या मंडळातच (Lalbaugcha Raja) हे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पोस्टरमुळे सर्वांच्याच मनात एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले आहे. या पोस्टरवर बिग बी तर आहेतच मात्र त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही (Vikram Gokhale) आहेत. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले मुख्य भूमिका साकारत आहेत आणि पोस्टरवर ते चक्क अमिताभ यांच्या ‘सारा जमाना हसीनो का दिवाना…’ या गाण्यामधील लुकमध्ये दिसून येत आहेत. विक्रम गोखले यांना या लुकमध्ये पाहणे सर्वांसाठीच ट्रीट असणार आहे.

या पोस्टरवर ‘कमिंग सून’ असे लिहिलेले आहे, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसावी असे दिसत आहे. चित्रपटाचे नाव यामागे दडलेल्या कथेची माहिती देते. ‘एबी आणि सीडी’ मधील एबी म्हणजे स्वतः म्हणजेच अमिताभ बच्चन, तर सीडी म्हणजे चित्रपटामधील गोखले यांची भूमिका, चंद्रकांत देसाई. (हेही वाचा: अमिताभ बच्चन यांचे 75% यकृत झाले खराब, या गंभीर आजाराने ग्रस्त आहे हे महानायक)

मिलिंद लेले दिग्दर्शित, अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) निर्मित आणि हेमंत एडलाबादकर लिखित या चित्रपटामध्ये अनेक कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बिग बी आणि विक्रम गोखले यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता अक्षय टंकसाळे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अग्निपथ जोडी विजय दीनानाथ चव्हाण (बिग बी) आणि आयुक्त गायतोंडे (विक्रम गोखले) तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा या चित्रपटाद्वारे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.