ऐकावं ते नवलचं! कांदाचोरी रोखण्यासाठी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी लावले सीसीटीव्ही कॅमेरे
कांदा (Photo Credit : ThoughtCo)

सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे गणित कोळमडले आहे. कांद्याच्या वाढत्या भावामुळे कांद्याची चोरीही वाढली आहे. ठाण्यातील महात्मा फुले मंडईत कांद्याची चोरी रोखण्यासाठी 20 ते 25 विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे कांद्याची चोरी थांबण्यास मदत होणार आहे. सध्या कांद्याचे भाव 120 ते 160 रुपये किलो आहेत.

मागच्या आठवड्यात ठाण्यातील मार्केटमधून 60 किलो कांद्याची गोणी चोरीला गेली होती. या मार्केटमध्ये वारंवार अशा कांदा चोरीच्या घटना घडत आहेत. कांद्याबरोबरच इतर भाज्यांचे भावही वाढले आहेत. काही व्यापाऱ्यांनी तर कांदा चारी रोखण्यासाठी वर्गणी करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. (हेही वाचा - मुंबईत भाज्यांचे दर कडाडले, बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशी ही सुरु राहणार)

महात्मा जोतिबा फुले मंडईमध्ये दररोज कांद्याच्या खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होत असतात. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांदा पिक वाया गेल्याने कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. आता शहरातील हॉटेलमधून कांदा गायब झालेला पाहायला मिळत आहे. कांद्याऐवजी हॉटेलमध्ये काकडी आणि कोबी दिला जात आहे. यावरून कांदा दरवाढीची झळ किती तीव्र आहे हे दिसून येते.