मुंबईत भाज्यांचे दर कडाडले, बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशी ही सुरु राहणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मुंबईतील बाजारात कांद्याचे दर 150 रुपयांवर पोहचल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढलेल्या किंमतीनुसार कांदा खरेदी करावा लागत आहे. एवढेच नाही कांद्यासोबत बटाटे, टोमॅटो यांच्या दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. तर शेतकरी आणि ग्राहकांच्या खरेदी- विक्रीची गैरसोय होऊ नये म्हणून बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरु राहणार आहेत.

शेतमालाची बाजारात सध्या घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्राहकांची भाज्यांच्या खरेदीबाबत गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टीच्या दिवशी सुद्धा व्यवहार आता सुरु राहणार आहेत. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तर ज्या ठिकाणी कांदा, टोमॅटो आणि बटाटे यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि आवक जास्त आहे अशा ठिकाणी सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम केले जाणार आहे.(कांदा शंभरीपार! नेटीझन्सनी बनवले TikTok वर मजेशीर व्हिडिओ Watch Video)

 नवी मुंबईतील कांद्याची आवक घटल्याने त्याचे परिणाम त्यांच्या किंमतीवर झाले आहेत. नवीन कांद्याचे दर 100 रुपयांच्यावर गेले असून जुना कांदा 120 रुपये प्रति किलोने बाजारात विकला जात आहे. मात्र आता जुन्या कांदा बाजारातून संपत असून नवीन कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मोठे नुकसान होत त्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचसोबत सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून कांद्याच्या दरात मोठया प्रमाणात मागणी वाढ झाली आहे. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील कांद्याची आवक घटली आहे.