कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले असून या व्हायरसला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रत्येक देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. चीनमध्ये जन्मलेला कोरोना व्हायरसने आता भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत संपूर्ण भारतात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 341 लोक कोरोना बाधीत असल्याचे माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले असून खबरदारीचा उपाय म्हणून पंजाब, राजस्थाननंतर महाराष्ट्रातही लॉकडॉऊन सुरु करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लोकडॉऊनकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त (Thane Municipal Commissioner) विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर, ठाणे जिल्ह्यात दहापेक्षा अधिक लोक एकत्र दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिक घराबाहेर पडणे टाळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थापना, शेअर प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी अजूनही नागरिक रस्त्यावर एकत्र येत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दहापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, आज रविवार 22 मार्च रोजी देशात जनता कर्फ्यू जाहीर झाल्याने परिवहन सेवेच्या बसगाड्या 40 टक्केच सुरू ठेवण्याच्या सूचनाही सिंघल यांनी दिल्या आहेत. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शहरातील अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, अन्य जीवनावश्यक वस्तू, औषधालये वगळून अन्य सर्व दुकाने, आस्थापना तसेच हॉटेल्स, बिअरबार, वाईन शॉप 31 मार्च 2020 पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात यावीत, असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. सर्व खाजगी कंपनी, खाजगी आस्थापना, सल्ला देणार्या संस्था, माहिती व तंत्रज्ञानक्षेत्रातील आस्थापना, सर्व उद्योग, व्यवसाय, व्यापार इत्यादी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. लोकांनी घरातूनच काम करावयाचे आहे. हे देखील वाचा- Coronavirus In India: 'जनता कर्फ्यू' दरम्यान नेमक्या कोणत्या सुविधा बंद आणि सुरू राहणार?
देशात कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता नागरिकांनी अधिक सज्ज होण्याची वेळ आली आहे. 31 मार्च पर्यंत सरकारने खाजगी संस्था, ऑफिस बंद ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलेआहे. आज संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 'जनता कर्फ्यू'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 मध्ये नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये कोरोनाबधितांपैकी आज दुसरा बळी गेला आहे. दरम्यान, उपचारादरम्यान आज (22 मार्च) 63 वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांपैकी मृतांचा आकडा आता 5 झाला आहे. मुंबई येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात आज एका कोरोनाबाधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृताचा परदेशी प्रवासाचा इतिहास आहे.