
ठाणे-मुंबईला जोडणारा कोपरी पूल (Kopari Bridge) आता उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज (9 फेब्रुवारी) दिवशी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले असून एमएमआरडीए (MMRDA) आज तो लोकांसाठी खुला देखील करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ही ठाणेकरांना भेट असणार आहे.
ठाणे आणि मुंबईला जोडणारा कोपरी पूल आता बांधून पूर्ण झाला असल्याने 9 फेब्रुवारीपासून या पूलाच्या 2 उर्वरित मार्गिका देखील नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. जूना पूल तोडून यावर दोन नव्या मार्गिकांचं बांधकाम करण्यात आलं आहे. ठाण्यामध्ये होणार्या वाहतूक कोंडीला यामुळे मोठा पर्याय निर्माण होणार असल्याने नागरिकांची त्यामधून सुटका होईल अशी देखील अपेक्षा आहे.
घोडबंदर, भिवंडी, नाशिक, कल्याण-डोंबिवली येथून सकाळी आणि संध्याकाळी चाकरमान्यांच्या प्रवासाच्या वेळेस मोठी वाहतूक कोंडी होते. अपुरा असणारा पूल आता वाढवण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दुपारी दीडच्या सुमारास या पूलाचे लोकार्पण होणार आहे. एमएमआरडीए कडून तयार करण्यात आलेल्या या पूलाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ठाणे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम तथा अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ठाण्याचे आमदार, खासदार देखील आमंत्रित आहेत.