Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून  13 जणांची सुमारे 8 कोटी रुपयांना फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ठाणे (Thane) जिल्ह्यातील एका दागिने फर्मच्या (Jewellery Firm) मालकाला अटक केली आहे. व्हिजीएन ज्वेलर्सच्या (VGN Jewellers) विरिट गोपालन नायर (Virit Gopalan Nair) या आरोपीला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मंगळवारी रात्री अटक केली. (Navi Mumbai: खोट्या सोन्याच्या दागिन्यांवर बँकेकडून 40 लाखांचे कर्ज मिळवणाऱ्या चौघांना खारघर पोलिसांकडून बेड्या)

नायरने त्याच्या पत्नीसह दागिने आणि आर्थिक फर्मची स्थापना केली आणि गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आश्वासन देऊन ठेवी स्वीकारण्यास सुरुवात केली होती. या दाम्पत्याने ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, उल्हासनगर आणि मुंबईतील मुलुंड येथे त्यांच्या फर्मच्या शाखा देखील सुरु केल्या होत्या.

2006 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान त्यांनी विविध योजनांतर्गत लोकांकडून गुंतवणूक स्वीकारली. प्रत्येक गुंतवणूकदार 24 महिन्यांसाठी 500 रुपयांची गुंतवणूक करू शकतो आणि 14,000 रुपये परतावा किंवा समतुल्य सोने मिळवू शकतो, अशी त्यांची एक योजना होती. इतर योजनेमध्ये एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींचा समावेश होता, ज्यावर ते वार्षिक 15 टक्के व्याज देणार होते. या दांपत्याने नवीन ग्राहकांची गुंतवणूक घेतली आणि जुन्या ग्राहकांना पैसे परत दिले, अशी माहिती पोलीसांनी दिली.

नायरने या प्रकरणातील तक्रारदाराच्या गुंतवणुकीची परतफेड न करता 66,36,500 रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर फसवणूक झालेल्या आयपीसी कलम 420, 406 आणि 409 अंतर्गत कल्याण विभागातील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसंच नायरविरोधात, महाराष्ट्र संरक्षण ठेवीदारांच्या हितसंबंध अधिनियम, 1999 चे कलम 3 देखील लावण्यात आले आहे.

आरोपींनी अशा प्रकारे एकूण 13 गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक तब्बल 7,99,63,710 रुपयांची होती. दाम्पत्याने या पैशांचा गैरवापर केला, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची पुढील चौकशी EOW द्वारे केली जात आहे.