ठाणे (Thane Crime) जिल्ह्यातील कल्याण (Kalyan News) परिसरात एका 61 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा एका धक्कादायक प्रकरणात दाखल झाला आहे. महिलेवर आरोप आहे की, घरगुती वादातून (Domestic Dispute) तिने चक्क आपल्या पतीला जीवंत जाळण्याचा आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पतीच्या सेवानिवृत्ती वेतनाच्या पैशांवर डोळा ठेऊन आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. या गुन्ह्यात आरोपीला दोन पुरुषांची मदत झाल्याचेही समजते. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नाही. पीडित सध्या रुग्णालयात दाखल झाला असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
पेन्शनच्या पैशांवरुन वाद
घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आणि पीडित (पती) यांच्यात काही काळापासून वाद आहेत. हा वाद प्रामुख्याने पेन्शनच्या पैशांवरुन सुरु आहे. आरोपीला भेटण्यासाठी दोन पुरुष वारंवार घरी येत असत. त्यामुळे त्यांच्या येण्यावर पीडिताला म्हणजेच आरोपीच्या पतीला आक्षेप असे. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला होता. जो काही दिवसांपासून सुरुच होता. वादाचे स्वरुप आणि पर्यावसन पाहता पत्नी आणि इतर दोन व्यक्तींकडून आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार पीडिताने पोलिसांमध्ये आगोदरच दिली होती. (हेही वाचा, Thane: पतीने पत्नीला जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू; ठाणे येथील घटना)
अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग
दरम्यान, हल्लेखोरांनी पीडितावर 8 डिसेंबरच्या रात्री हल्ला केला. पीडिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला पेटवून दिले. दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीला धावले. त्यांनी पीडिताला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा, धक्कादायक! घरात बनवलेली वांग्याची भाजी संपल्याने पतीला क्रोध झाला अनावर, पत्नीवर रॉकेल ओतून जिवंत जाळले)
आरोपींपासून धोका असल्याची पीडिताकडून पोलिसांमध्ये आगोदरच तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धक्कादायक घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु आहे. प्रकरणात चौकशी सुरु असून अधिक तपशील गोळा करण्याचे काम सुरु आहे. पीडिताने आगोदरच दोन तरुण आणि पत्नीपासून धोका असल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत. पोलीस हत्येच्या प्रयत्नाच्या आजूबाजूच्या तथ्यांचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी कसून प्रयत्न करत आहेत.
कौटुंबीक वादातून जीवघेणा हल्ला, हत्या किंवा बेदम मारहाण, शाब्दिक हिंसा हे प्रकार समाजाला नवे नाहीत. गैरसमज, व्यक्तीगत महत्वाकांक्षा, अन्यायाची भावना किंवा अतिरिक्त पैशांचा हव्यास यातून असे प्रकार घडत असल्याचे अनेकदा पुढे येते. काही प्रकरणांमध्ये घटना घडून गेल्यानंतर किंवा प्रकरण टोकाला गेल्यावरच पोलिसांची मदत घेतली जाते. त्यामुळेही अनेकदा मदत मिळण्यास विलंब होतो आणि दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर पोलिसांची मदत घेतली जावी असे, सामाजिक घटनांचे अभ्यासक सांगतात.