बीड जिल्हा परिषदेच्या शाळेत (Beed Zilla Parishad School) अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकांनी एचआयव्हीग्रस्त बालकांना (HIV Infected Children) शाळेतून हाकलून लावल्याची घटना घडली आहे. हे विद्यार्थी इनफंट इंडिया या संस्थेतील आहेत. या प्रकारानंतर इनफंट इंडिया या संस्थेचे अध्यक्ष दत्ता बारागजे यांची जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली असून पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
या प्रकारानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. परंतु, या आरोपानंतर संबंधित जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात आपली बाजू मांडताना शाळेचे मुख्याध्यापक के. एस. लाड यांनी म्हटलं आहे की, आम्ही त्यांना हाकलून दिलेलं नाही. इनफंट इंडिया या संस्थेतील 6 वी ते 10 वीपर्यंतचे विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आम्ही कोणताही दुजाभाव केलेला नाही. आमच्याविरोधात झालेले आरोप खोटे आहेत. (वाचा - धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीची पोलिस आयुक्तांकडे तक्रार; मुलांना तीन महिन्यांपासून लपवल्याचा आरोप)
दरम्यान, या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना मुंडे यांच्याकडून दिल्या जाऊ शकतात. सध्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यापूर्वी मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांच्या बहिणीने मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर आता करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
करुणा शर्मा यांनी त्यांच्या दोन मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. तेथे मुलं सुरक्षित नाहीत. माझी मुलं सुरक्षित नसून मुलीचा सांभाळ करण्यासाठी कोणीही महिला केअरटेकर नाही, असंही करुणा शर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.