राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासमोर पुन्हा नवी अडचण निर्माण झाली आहे. मुंडेंविरुद्ध दुसऱ्या पत्नीने मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. तसंच यामध्ये एक 14 वर्षांची मुलगी असून मुलं सुरक्षित नसल्याचे देखील त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सहकार्य न केल्यास 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने तक्रारीत म्हटले की, 24 जानेवारी रोजी मुलांना भेटण्यासाठी बंगल्यावर गेले असता मुंडे यांनी 30-40 पोलिसांच्या साहाय्याने हाकलून दिले. माझी मुले सुरक्षित नसून यात 14 वर्षांची मुलगी अडकून पडली आहे. तिच्यासाठी कोणी केअरटेकर नाही. माझ्या मुलांना काही झाल्यास त्यास मुंडे जबाबदार असतील. मुंडे मुलांसमोर अश्लील वर्तन करत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसंच मुंडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी देखील करुणा यांनी केली आहे.
मुलांना भेटू न दिल्यास 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. चित्रकूट बंगल्यासमोर, मंत्रालय किंवा आझाद मैदान येथे उपोषणासाठी त्यांनी परवानगी मागितली आहे. (Pankaja Munde On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर पंकजा मुंडे यांनी सोडलं मौन; वाचा काय दिली पहिली प्रतिक्रिया)
दरम्यान, मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने देखील फेसबुक पोस्टद्वारे देखील ही बाब उघड केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, "आज माझा वाढदिवस आहे. पण माझ्या नवऱ्याने माझ्या मुलांना 3 महिन्यांपासून चित्रकूट बंगल्यात लपवले आहे. मला त्यांना भेटण्याची-बोलण्याची परवानगी नाही. ते त्यांच्या राजकीय शक्तीचा दुरुपयोग करत आहेत. इतका अत्याचार रावणाने देखील केला नसेल."
यापूर्वी मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने देखील मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी तक्रार मागे घेतल्यावर त्या प्रकरणावर पडदा पडला असे वाटत असतानाच आता मुंडे यांच्यावर नव्याने आरोप होत आहेत.