Pankaja Munde, Dhananjay Munde (PC - Facebook)

Pankaja Munde On Dhananjay Munde: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर (Dhananjay Munde) झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मौन सोडलं आहे. 'तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करु शकत नाही. पण, कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो,' अशी पहिली प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलचं,” असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. (वाचा - Dhananjay Munde Allegation Case Update: धनंजय मुंडे यांना दिलासा, तक्रारदार महिलेकडून तक्रार मागे; भाजपकडून महिलेच्या चौकशीची मागणी)

दरम्यान, यावेळी पंकजा मुंडे यांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी केली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीही ओबीसी जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडला होता. आता प्रीतम मुंडे यांनीदेखील ओबीसी जनगणनेसाठी संसदेत आवाज उठवला आहे. जातीनिहाय जनगणना झालीचं पाहिजे. यात प्रत्येक गोष्टी स्पष्ट होतील. या जनगणनेमुळे ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी मदत होईल, असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. (वाचा -Sharad Pawar On Dhananjay Munde: महाविकासआघाीड सरकार पाच वर्षे टिकेल, धनंजय मुंडे प्रकरणात आमचा निष्कर्ष बरोबर होता- शरद पवार)

पंकजा मुंडे यांनी रविवारी गोपीनाथ मुंडे यांचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात त्यांनी भाजपला जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली. आम्हीदेखील या देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.