Tarkarli Beach Accident: तारकर्ली समुद्र किनारी स्कुबा डायव्हिंग करून येणार्‍या प्रवाशांची बोट बुडाली; दोघांचा मृत्यू
(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणातील तारकर्लीच्या समुद्र किनारी (Tarkarli Beach) एक दुर्घटना घडली आहे. आज (24 मे ) दुपारी स्कुबा डायव्हिंग (Scuba Diving) करून परतत असलेली एक बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या बोटीत 20 प्रवासी होते त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. काही गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार, आकाश देशमुख आणि स्वप्निल पिसे यांचा मृत्यू झाला आहे. समुद्र किनारी येत असताना 'जय गजानन' नावाची बोट बुडाली आहे. या दुर्घटनेची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण बोट चालक, मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

बोट चालकाकडून लाईफ जॅकेट दिले होते का? बोटीची प्रवासी क्षमता किती होती याची माहिती घेतली जात आहे. तसेच सध्या घटनास्थळी पोलिस, जिल्हाधिकारी दाखल झाले आहेत. तारकर्ली बीच वर स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून जैव विविधता अनुभवता येते. त्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. तसेच समुद्र किनारी अनेक वॉटर स्पोर्ट्सचं  देखील आयोजन केले जाते. त्यामुळे सध्या उन्हाळी सुट्टीच्या काळात मुंबई-पुणे कडून मोठ्या प्रमाणात पर्यटक तारकर्ली बीचला भेट देतात. एमटीडीसी सोबतच अनेक रिसॉर्ट्स देखील समुद्रकिनारी आहेत.  नक्की वाचा: जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश.

काही महिन्यांपूर्वीच सिंधुदुर्ग मध्ये चिपी एअरपोर्ट देखील सुरू झाले आहे त्यामुळे आता सिंंधुदुर्ग जिल्ह्यांत पर्यटकांचा ओढा वाढला आहे. गोव्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटकांंमुळे समुद्र किनारे, हॉटेल्स फुल्ल असतात त्यामुळे अनेकदा राज्यातील पर्यटकांची पसंती कोकणातील समुद्र किनार्‍यांना असते. कोकणात सध्या मागील काही दिवसांपासून पूर्व मोसमी पाऊस सुरू झाला आहे.