Taloja MIDC Fire| Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई मध्ये अजून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. नवी मुंबई मधील तळोजा एमआयडीसी (Taloja MIDC) मध्ये एका रासायनिक कारखान्याला आज (9 फेब्रुवारी) दुपारी आग लागली आहे. अद्याप आगीचं कारण समजू शकलेले नाही मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने या परिसरात धूराचे मोठे लोट पहायला मिळत आहेत. मागील तासभरापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान ही आग रासायनिक कारखान्याला लागली असल्याने काही फॉगिंग इक्विपमेंट यांनी सज्ज असलेल्या विशेष अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. तर कल्याण डोंबिवली आणि मुंबई मधूनही अधिकची कुमक मागवण्यात आली आहे.

दरम्यान अद्याप तळोजा एमआयडीसी मधील आगीत कोणाचा बळी गेला नसल्याची माहिती आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे देखील समजू शकलेले नाही. पण घटनास्थळी काही सौम्य स्फोट होत असल्याची माहिती समोर आल्याने अंदाजे 2 किमी परिसरामध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे.

तळोजा एमआयडीसीत भीषण आग

मागील काही दिवसांपासून मुंबई, पुण्यात भीषण आगीच्या घटना ताज्या आहेत. त्यामध्ये पुण्यातही सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी प्लांटला आग लागली होती. त्यानंतर मुंबईत मानखुर्द परिसरातही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे भीषण आग लागली होती. आज तळोजा एमआयडीसी मध्ये प्लॉट नंबर 34, 35 मध्ये असलेल्या एका रासायनिक कारखान्याला आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.