Sushant Singh Rajput Death Case: Aaditya Thackeray यांची उच्च न्यायालयात दाखल केले कॅव्हेट
Aaditya Thackeray | Insta

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) यांच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये आता आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केलेल आहे. सीबीआय चौकशीची फौजदारी स्वरूपाच्या जनहित याचिकेद्वारे मागणी करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी हे पाऊल उचललं आहे. कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी यासाठी आमदार आदित्य यांनी कॅव्हेट दाखल केलेले आहे. वकील राहुल आरोटे यांच्यामार्फत हे कॅव्हेट दाखल केले आहे. सीबीआय चौकशी करत असताना याचिकेद्वारे पुन्हा तीच मागणी कशी काय केली जाऊ शकते ? असा सवाल त्यामध्ये विचारण्यात आला आहे.

‘सुप्रीम कोर्ट अ‍ॅन्ड हायकोर्ट लिटिगंट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने अध्यक्ष रशीद खान पठाण यांच्याकडून सप्टेंबरमध्ये फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका केली होती. तसेच, सुशांत आणि दिशा यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना तातडीने अटक करण्याची आणि त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अद्याप ही याचिका सुनावणीसाठी आलेली नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू 14 जून 2020 दिवशी मुंबईच्या वांद्रे येथील घरामध्ये झाला होता. पोलिसांनी त्याचा मृत्यू अपघाती मृत्यू असा नोंदवून घेतला आहे. सध्या त्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू आहे. सुशांतच्या वडिलांकडून त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल बिहार पोलिस स्टेशन मध्ये तक्रारही दाखल आहे. हे प्रकरण सध्या सीबीआय कडे वर्ग करण्यात आले असून रिया आणि तिच्या कुटुंबीयांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी सुरू आहे. याशिवाय, रिया ही अंमली पदार्थाचे सेवन करत होती आणि तिने ते सुशांतलाही दिल्याच्या आरोपांचा केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभाग तपास करत आहे. Sushant Singh Rajput Suicide Case: सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; आमदार नितेश राणे यांची मागणी .

सुशांत सह अनेक बॉलिवूड कलाकारांची मॅनेजर दिशा सॅलियनचा मृत्यू सुशांतच्या काही दिवस आधी झाला आहे. मालाड येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशा हिची हत्या झाली असून आदित्य ठाकरे यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.