राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना उद्देशून गुजराती भाषेत (Gujarati Language) संवाद साधताना दिसतात. झी मराठी वाहिनीवर ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) हा कार्यक्रम येऊ घातला आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. येत्या 29 जुलै पासून प्रक्षेपीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या चित्रिकरणादरम्यान, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांनी पंतप्रधानांशी गुजराती भाषेत संवाद साधला. युट्यूबवर हा व्हिडिओ पाहायला मिळतो.
दरम्यान, ‘बस बाई बस’ कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांनी एका खेळात सहभाग नोंदवला. सूत्रसंचालकाकडून त्यांना विविध राजकीय नेत्यांचे फोटो दाखवण्यात आले. या नेत्यांना उद्देशून संवाद साधण्याबाबत सुप्रिया यांना सांगण्यात आले. या वेळी सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून संवाद साधला. झी मराठीने हा व्हिडिओ युट्यूब आणि सोशल मीडियावरही शेअर केला आहे. (हेही वाचा, OBC Reservation: खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे लोकसभेत मागणी 'राज्याला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा द्यावा')
सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून साधलेल्या संवादात म्हटले की,
मादीजी, नमस्कार..! आपण कसे आहात..
मी नुकतीच गुजरातला जाऊन आले. गुजरात खूप चांगले आहे. तिथे सगळे ठिक आहे. माझ्या गुजरात दौऱ्यात मला दर्शनाबेन भेटल्या. मला त्यांनी सूरतचा फाफडाही खायला दिला. सूरतमध्ये मला काही आमदारही भेटले. मला माहितच नव्हते ते रेडिसन्स हॉटेलमध्ये थांबलेत याची. हो, तेथे अमित शाह सुद्धा भेटले. ते संसदेत रोजच येतात. ते भाषण छान करतात. फक्त तुम्हीच नाही येत संसदेत. तुम्हीही या ना.. संसदेत. आम्हाला छान वाटेल. माझं भाषण आपण ऐकलंत का? तुम्ही माझं भाषण ऐकलं तर मला आवडेल. मी थोडं गुजराती बोलायला शिकत आहे.... थोडं.. थोडं शिकले आहे. त्यामुळे मी थोडं गुजराती आणि थोडं मराठी बोलते.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या संवादात पुढे म्हटले की, महाराष्ट्र आणि गुजरातचे संबंध मोरारजी भाई यांच्या काळापासून चांगले आहेत. तुम्हाल आठवतं..? आपली पहिली भेट झाली तेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतात. मी आपण आणि अनुराग ठाकूर एक सामना पाहायला गेलो होतो. तुम्ही या आपण परत सामना पाहायला जाऊ. आपण पंतप्रधान आहात. त्यामुळे आपला वेळ फार महत्त्वाचा आहे हे मला ठाऊक आहे. असो... मी निघते.
व्हिडिओ
टीव्हीवर हा कार्यक्रम अद्याप प्रसिद्ध व्हायचा आहे. मात्र, तोवर या कार्यक्रमाचा प्रोमोच्या रुपात जेवढा भाग प्रसिद्ध झाला आहे त्यावरुन अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा कार्यक्रम फारच मनोरंजक असल्याचे म्हटले आहे. तर काहींना वाटते सुप्रिया सुळे खूपच चांगले गुजराती बोलतात आणि त्यांनी या कार्यक्रमात चांगली मज्जा केली आहे.