Supriya Sule | Twitter

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर आता ठाकरे गट आणि शरद पवार यांचा गट कॉंग्रेस सोबत एकत्र राहत आगामी निवडणूकांचा सामना करणार आहे. अशामध्ये ठाकरे गटाने लोकसभेत 23 जागांवर दावा ठोकला आहे. त्यावरून कॉंग्रेस मधून काही नेत्यांनी आक्षेप व्यक्त केल्यानंतर अंतर्गत कुरबुरींची चर्चा रंगली आहे. यावर दोन्ही पक्षांकडून ठोस जागावाटपाची माहिती दिलेली नाही. मात्र आज एनसीपी च्या (शरद पवार गट) च्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळेंनी अंतर्गत समज-गैरसमजाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 15 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेमध्ये सविस्तर जागावाटपावर चर्चा झाली आहे. केवळ हा निर्णय जाहीर झालेला नाही. तो येत्या 8-10 दिवसांत जाहीर केला जाऊ शकतो. आमच्यामध्ये जागावाटपामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच एनसीपीचा किती जागांवर यामध्ये वाटा असेल यावरही त्यांनी आता थेट बोलणं टाळलं आहे.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

देशामध्ये येत्या काही महिन्यातच लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी लोकसभा निवडणूकांसाठी सध्या सारेच पक्ष तयारीला लागले आहेत. पक्ष बांधणीसोबतच मतदारसंघांचा आढावा घेण्याचं काम देखील सुरू करण्यात आले आहे. शिवसेना आणि एनसीपी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता पुढील प्रवास त्यांचा कसा होणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे.