सुनील तटकरे यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी; परिसरात खळबळ
सुनिल तटकरे (Photo Credit : Youtube)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल तटकरे यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यालयात पोस्टाने हे पत्र आले आहे. पूर्ववैमनस्यातून अशा प्रकारची धमकी दिली गेली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत नाझीम हासवरे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची धमकी मिळाली असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पत्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळी या गावातील बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते या व्यक्तीचा उल्लेख आहे.या व्यक्तीची मदत घेऊन सुनील तटकरे यांना मारून टाकण्याचा प्लान असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच या पत्रातील व्यक्तीला शोधून त्वरित कारवाई करावी असेही म्हंटले आहे. (हेही वाचा: मोहिते-पाटील यांचा फोन स्विच ऑफ होता, राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक तिकीट त्यांनाच तर देणार होते)

सुनील तटकरे हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आहेत, त्यामुळे या पत्राकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. याबाबत तक्रार दाखल केल्यावर लगेच पोलिसांनी एक स्पेशल टीम तयार करून, पत्रातील पत्त्यावर पाठवली आहे. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.