Ajit Pawar With Vijay Singh Mohite Patil | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Election 2019: माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha constituency), विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil) यांची लोकसभेसाठी उमेदवारी आणि पक्षाचे निवडणूक तिकीट यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुलासा केला आहे. विजयसिंह मोहिते पाटील ज्येष्ठ आहेत. त्यांच्यासारख्या नेत्यांची लोकसभेत आवश्यकता आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून रष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांनाच तिकीट देणार होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी त्यांना सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन स्विच ऑफ ठेवला आणि आपला निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लख आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहते पाटील यांनीच लढावे, असा शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. परंतु, विजयसिंह मोहिते पाटील यांनी वेगळ्या नावाचा आग्रह धरला. त्यास माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माळशिरस वगळता इतर विधानसभा मतदारसंघातील आमदारांचाच विरोध होता. खरे तर, विजयसिंह मोहिते पाटील यांची लोकसभेत गरज होती. पण, त्यांनी फोनच स्विच ऑफ ठेवला आणि आपला निर्णय घेतला असेही अजित पवार यांनी सांगितले. (हेही वाचा, 26 वर्षांचा संघर्ष संपणार? भाजप आमदार अनिल गोटे यांनी घेतली शरद पवार यांची भेट)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. या मेळाव्यास पक्षाच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रवक्ते अंकुश काकडे, बापू पठारे, रवींद्र माळवदकर, कमल ढोले पाटील, रुपाली चाकणकर, अश्विनी कदम, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले, जालिंदर कामठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील यांनाही दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून आम्ही उमेदवारी देण्यास तयार होतो. मात्र, नेमकी कुठे माशी शिंकली हेच माहिती नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले.