Summer Specials Trains: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून 626 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा
Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू महामारीनंतर यावर्षी सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये (Summer Season) अनेक लोक प्रवासासाठी बाहेर पडले आहेत. आता उन्हाळी हंगामातील प्रवाशांची सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी, मध्य रेल्वेने (Central Railway) 2022 मध्ये सध्याच्या गाड्यांव्यतिरिक्त 626 मूळ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. 2021 आणि 2019 मध्ये, मूळ उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या अनुक्रमे 435 आणि 540 होती. 2020 मध्ये, कोविड-19 साथीच्या आजारामुळे कोणतेही उन्हाळी विशेष ट्रेन चालवली गेली नाही.

या 626 उन्हाळी विशेष गाड्या एप्रिल ते जून 2022 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर/लोकमान्य टिळक टर्मिनस/पनवेल/पुणे/नागपूर आणि साईनगर शिर्डी यांसारख्या मध्य रेल्वे स्थानकांवरून निघतील. त्याशिवाय इतर रेल्वे झोनने जाहीर केलेल्या 64 विशेष गाड्या या उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या स्थानकांवरून निघतील.

या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, मऊ, समस्तीपूर, बनारस आणि थिविम दरम्यान 306 उन्हाळी विशेष गाड्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड, नागपूर, मालदा टाउन आणि रेवा दरम्यान 218 उन्हाळी विशेष, पुणे ते करमाळी, जयपूर, दानापूर, विरांगना लक्ष्मीबाई स्टेशन आणि कानपूर सेंट्रल दरम्यान 100 उन्हाळी विशेष गाड्या, नागपूर ते मडगाव दरम्यान 20 उन्हाळी विशेष, साईनगर शिर्डी आणि दहार का बालाजी दरम्यान 20 उन्हाळी विशेष, पनवेल आणि करमाळी दरम्यान 18 उन्हाळी विशेष, दादर आणि मडगाव दरम्यान 6 उन्हाळी विशेष आणि लातूर आणि बिदर दरम्यान 2 उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Central Railway: एसी ट्रेन सेवा हार्बरवरून मेन लाईनवर वळवण्याची शक्यता)

विशेषत: उत्तर आणि पूर्वेकडील गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन, विविध उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये जास्तीत जास्त सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडले जात आहेत. मध्य रेल्वेने आधीच जोडलेल्या सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांच्या व्यतिरिक्त, बलिया आणि गोरखपूरला जाणार्‍या उन्हाळी विशेषांसाठी दोन सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे वाढवण्याची घोषणा केली आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी NTES अॅप डाउनलोड करावे, रेल्वेने सांगितले आहे.