Uday Samant | (Photo Credits: Twitter)

Uday Samant Tests COVID-19 Positive: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक मंत्री कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात सापडले आहेत. अशातचं आता शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सचिन सानप (Sachin Sanap) हेदेखील कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्याला कोरोनाची विषाणूची लागण झाली असल्याचे सांगितले आहे. उदय सामंत गेल्या 10 दिवसांपासून विलगीकरणात आहेत. त्यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचं म्हटलं असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा विश्वासदेखील सामंत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेल्या 10 दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.' (हेही वाचा - Corona Patient Dies By Suicide: थरारक! सांगली जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालयात कोरोनाबाधिताची गळा कापून आत्महत्या)

महाविकास आघाडीमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मागील आठड्यात कोरोना विषाणूची लागण झाली होती. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूचं आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मागाठाणे मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली होती.

कोरोना संकटात लोकप्रतिनिधी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. परंतु, लोकप्रतिनिधींनादेखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं समोर येत आहे. सध्या देशात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 61 लाखाहून अधिक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे.