महाराष्ट्र: दिवाळीपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता अस्पष्ट, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण होणार का याकडे शेतक-यांचे लक्ष
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांचे प्रचंड नुकसान झाले. काही गावे पाण्याखाली गेली. तर शेतक-यांच्या पिकांचे, फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झाले. यामुळे नुकसानग्रस्त भागांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी  अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र अजून ही मदत पोहचली नसून त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) मान्यता मिळणे बाकी आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत मिळण्याची चिन्हे थोडी धुसर झाल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. ही मदत दिवाळीपूर्वी संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र ही मदत पोहोचण्यास थोडा अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, त्याबाबतची आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक आहे. शनिवारपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानी मदत वाटपासाठी संमती मिळाली नव्हती. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून, आयोगाची मान्यता लवकरच मिळेल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. हेदेखील वाचा- Package For Maharashtra Farmers: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज केले जाहीर, दिवाळीपर्यंत दिली जाणार मदत

अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे यंदाची दिवाळी साजरी करता येईल की नाही हा देखील नुकसानग्रस्तांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत सरकारची मदत वेळेवर पोहोचली नाही तर शेतक-यांवर देखील मोठे आर्थिक संकट येईल असे चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 23 ऑक्टोबरला घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा केली. यात नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकार हे या आपत्तीजन्य परिस्थितीत शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले आहे.