महाराष्ट्रात हैदोस घातलेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतक-यांच्या पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे. यात नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकार हे या आपत्तीजन्य परिस्थितीत शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले आहे.
त्याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेली ही मदत नुकसानग्रस्तांना दिवाळीआधीच दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यासोबत अनेक महत्त्वाच्या घोषणा या बैठकीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अतिवृष्टी नुकसान झालेल्यांना मदतीची प्रतिक्षा; अजित पवारांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाच्या बैठक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय
- पाणीपुरवठ्यासाठी 1,000 कोटी
- रस्ते आणि पुलासाठी 2635 कोटी
- नुकसानग्रस्त कृषी आणि घरांसाठी 5500 कोटी
- जिरायती, बागायती शेतीसाठी 10,000 प्रति हेक्टर
- फळपिकांच्या नुकसानीसाठी 25,000 प्रति हेक्टर
- नगरविकासासाठी 300 कोटींची मदत
या महत्त्वाच्या पॅकेजची घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे. केंद्राला पत्र पाठवूनही त्यांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचसोबत केंद्र सरकारची महाराष्ट्रासोबत दुजाभावाची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. केंद्र महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे देत नाही. केंद्राकडून एकूण 38 हजार कोटी रुपये येणं बाकी आहे असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी महाराष्ट्रात आलेले नाही. आम्ही या संदर्भात त्यांना वारंवार विनंतीदेखील केली असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.