दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! कलेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार अधिक गुण
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (SSC Students) एक आनंदाची बातमी दिली आहे. कला, चित्रकला आणि Culture Exams देणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार यावर्षी बोर्डाच्या परीक्षेत अधिक गुण देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. गेल्या वर्षी चित्रकलेच्या एलिमेंटरी (Elementary) आणि इंटरमीडिएट (Intermediate) परीक्षा होऊ शकल्या नाहीत. परंतु, अशा परिस्थितीही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स (Grace marks) देण्यात यावेत, अशी मागणी आर्ट आणि ड्रॉईंग क्लास असोशिएशनकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता गेल्या वर्षीच्या परीक्षेच्या गुणांनुसार विद्यार्थ्यांना यावर्षी ग्रेस मार्क्स देण्यात यावेत, असे राज्य सरकारने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

विद्यार्थी 3 वर्षांहून अधिक काळापासून मेहनत घेत असल्याने त्यांना ग्रेस मार्क्स देण्यात यावेत, अशी मागणी कला अध्यापक संघाचे सचिव सुनील बोरोले आणि इतर कला शिक्षक संघटनांनी केली होती. बोरोले यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यापासून विविध शाळांमधील विद्यार्थी अधिक गुणांसाठीचा प्रस्ताव शाळेसमोर मांडत आहेत. अनेक विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांना ग्रेडनुसार अधिक गुण दिले जातात. परंतु, मागील वर्षी कोविड-19 लॉकडाऊनमुळे परीक्षा झाल्या नाहीत. यापूर्वी या अधिक गुणांमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना 100 टक्के मिळवण्यात मदत झाली होती.

भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी कला शिक्षक संघटना करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेपूर्वी एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट परीक्षा दिल्या असतील अशा विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळतील, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. (Maharashtra 10th Board Exam 2021: इयत्ता 10 वी परीक्षा मुल्यांकनाबाबत शिक्षण विभागाकडून तपशील जारी)

मुल्यांकन पद्धती:

मागील 5 वर्षांपासून शास्त्रीय नृत्य, नाटक आणि गायन शिकणाऱ्या आणि सरकारमान्य संस्थेकडून आयोजित केलेल्या कमीत कमी 5 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये 15 अधिक गुण देण्यात येतील. 3 परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना 10 अधिक गुण देण्यात येतील. तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कला क्षेत्रात स्कॉलरशिप प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना 25 अधिक गुण देण्यात येतील. त्याचबरोबर इंटरमिडिएट चित्रकला परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत 5-15 गुण देण्यात येणार आहेत.