Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांना बसण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या म्हणजेच फॉर्म नं. 17 भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ही सुविधा उपलब्ध असेल. दरम्यान, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केले आहे. दरम्यान, ट्विटच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

दहावी परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म  http://form17.mh-ssc.ac.in या तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म उपलब्ध होतील. 22 नोव्हेंबरपासून विद्यार्थी नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरु शकतील. तर 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा कराव्या लागतील.

वर्षा गायकवाड ट्विट:

फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रं:

विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. तसंच संपर्कासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल क्रमांक व ई-मेल देणे अनिवार्य असणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरताना दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी लागेल.

अर्जासाठी शुल्क:

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल. तर बारावीसाठी 500 रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल. एकदा अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसंच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची असल्यास पुन्हा नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.

दरम्यान, विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत  020/25705208, 25705207, 25705271 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे.