Praveen Chavan Resigns: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर विशेष सरकारी वकिलाचा राजीनामा, गृहराज्यमंत्र्यांकडून CID तपासाला परवानगी
Devendra Fadnavis (Pic Credit - ANI)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत 125 तासांचा व्हिडिओ कंटेंट असलेला पेन ड्राइव्ह सादर केला होता. यामध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Public Prosecutor Praveen Chavan) यांचे स्टिंग ऑपरेशन झाले. या स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रवीण चव्हाण यांच्या कबुलीजबाबाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार सरकारी वकील आणि पोलिसांच्या मदतीने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. या आरोपाबाबत गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सोमवारी विधानसभेत फडणवीस यांच्या आरोपाची चौकशी सीआयडी करणार असल्याची माहिती दिली. तसेच सरकारी वकिलाचा राजीनामा घेण्यात आल्याचे सांगितले.

मात्र भाजप सीबीआयकडून तपास करण्यावर ठाम आहे. या मागणीवरून सोमवारी भाजप आमदारांनी सभात्याग केला आणि विधानसभेतून बाहेर पडले. दिलीप वळसे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पेनड्राइव्ह आम्ही तपासून घेऊ.  याप्रकरणी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा सादर केला आहे.  आम्ही या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवत आहोत. चौकशीनंतर संपूर्ण सत्य बाहेर येईल, अशी आशा आहे. हेही वाचा खूशखबर! राज्यात लवकरच होणार 7,231 पदांची पोलीस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा

मात्र यावर देवेंद्र फडणवीस यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले, गिरीश महाजन यांना पेनड्राइव्हमध्ये कसे अडकवायचे याचा व्हिडिओ आहे. असे पुरावे गोळा करण्यासाठी सरकारी वकील नेमण्यात आला आहे का? तुम्ही ही बाब गांभीर्याने घ्याल, अशी अपेक्षा होती. पण आता तसे दिसत नाही. सरकारच्या दबावाखाली काम करणारे पोलिस पथक या प्रकरणाचा योग्य तपास करेल, यावर विश्वास ठेवायचा का? सीआयडी याचा तपास करू शकत नाही. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची आमची मागणी आहे. तसे झाले नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ.

या संपूर्ण चर्चेदरम्यान दिलीप वळसे पाटील म्हणाले की, फडणवीस रोज एक पेन ड्राइव्ह समोर आणत आहेत. त्यांनी कुठलीतरी डिटेक्टिव्ह एजन्सी उघडलेली दिसते. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या एजन्सीचे नाव आहे FBI म्हणजेच फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तेव्हा ते म्हणाले की, जे काम विरोधी पक्षनेते करतात तेच काम मी करतो.