Maratha Mukh Morcha in Kolhapur: कोल्हापूरात आज 'मूक मोर्चा'; मराठा आरक्षण मुद्द्यावर एल्गार
मराठा आरक्षण (संग्रहित प्रतिमा)

Maratha Mukh Morcha: मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर कोल्हापूरात आज 'मूक मोर्चा' (Silent Protest) आयोजित करण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे या मोर्चाचे नेतृत्व  करणार आहेत. 6 जून रोजी रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या वेळी केलेल्या भाषणात संभाजीराजे छत्रपती यांनी येत्या 16 जून रोजी कोल्हापूर येथून मूक मोर्चा ( Silent Protest Kolhapur) काढणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे म्हटले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनास सुरुवात केली जाईल, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळी 11 वाजता या आंदोलनास सुरुवात होईल.

मराठा आंदोलन हे कोल्हापूरपासून सुरु होईल. सुरु होणार असले तरी पुढे ते महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हे आंदोलन पाच जिल्ह्यांमध्ये होईल. त्यानंतर हुळूहळू या आंदोलनाचे इतर टप्पे पार पडतील. दरम्यान, आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी काही नियमावलीही सादर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मोर्चेकऱ्यांनी मौन बाळगायचे आहे. तसेच, कोरोना नियमांचे पालन करुन हे आंदोलन करायचे आहे. कोरोना संसर्ग वाढेल असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये असा सूचना आंदोलकांना करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, Maratha Reservation: मोठी बातमी! संभाजीराजे यांच्या मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी)

मराठा मूक मोर्चासाठी राज्यभरातून समन्वयक कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाला येणाऱ्या सन्मवयकाची नोंद पोलिसांकडे असणार आहे. तसेच, कोरोना नियमांचे पालन करुन हे आंदोलन पार पडेल यांकडेही पोलिसांचे लक्ष असणार आहे.

मराठा मोर्चेकऱ्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक अचारसंहीता सादर केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 16 जून पासून मराठा क्रांती मूक आंदोलनाचे दुसरे पर्व राजर्षी शाहू समाधी स्थळ कोल्हापूर येथून प्रारंभ होत आहे. त्याची आचार संहिताही जाहीर करण्यात आली असून काळ्या रंगाची वेषभुषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून येणे. काळा मास्क वापरणे.(No Mask No Entry) असा गणवेश घालूनच मराठा आंदोलकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री, Sanitizer सोबत ठेवून त्याचा वापर करणे, आंदोलन स्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन न करणे, कोरोनाचे नियम कसोशीने पाळणे अशी सक्त ताकीद समन्वयकांनी दिली आहे. मराठा समाजाने यापूर्वी 58 मूक मोर्चा वेळी आपल्या वर्तनाने जगात आदर्श निर्माण केला होता. तोच आदर्श घेऊन यापुढेही वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे. परंतु आपली ती शक्ती विचारपूर्वक वापरणे काळाची गरज आहे.असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.