
श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवे (Shrimant Mahendra Peshwa) यांचं आज पुण्यामध्ये निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. महेंद्र पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे 9 वे वंशज होते. ते पुण्यामध्येच राहत होते.
महेंद्र पेशवे यांनी महाराष्ट्रातील राजघराण्यांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्य महासंघ याची निर्मिती केली होती. ते याचे कार्याध्यक्ष होते. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. पुण्यात पेशव्यांची दोन कुटुंबा राहतात. त्यापैकी कृष्णराव यांचा मुलगा श्रीमंत महेंद्र पेशवा हे होते.
बीबीसी च्या रिपोर्ट्सनुसार, महेंद्र यांचे वडील सरकारी नोकरी मध्ये होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण महाराष्ट्राबाहेर म्हणजे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश याभागात झाले होते. बीबीसी ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राबाहेरही पेशव्यांना आदर आणि आपुलकी मिळते असा अनुभव आल्याचं म्हटलं होतं.
पुण्यामध्ये देखील कोरोना वायरसचं मोठं थैमान पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग़्ण पुण्यामध्ये आहेत. अनेकांची रेमडेसीवीर, ऑक्सिजन अभावी वेळेत बेड न मिळाल्याने मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत.