धक्कादायक! वर्गमित्रांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर धमकावले व ब्लॉक केल्यामुळे वसई येथील 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या
आत्महत्या (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया यांचा आपल्या जीवनात इतक्या मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे की, जणू काही आपले संपूर्ण आयुष्य याच गोष्टींच्या भोवती फिरत आहे. याच बाबत एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 18 वर्षीय मास मीडिया विद्यार्थ्याने, व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सारख्या कारणावरून आत्महत्या (Suicide) केली आहे. वसई येथे ही घटना घडली आहे.

आपले वर्गमित्र असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून धमकावले आणि ब्लॉक केले, यामुळे या तरुणाने आत्महत्या केली आहे. शुक्रवारी आपल्या वसईच्या घरी त्याने आपले आयुष्य संपवले. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

जय (नाव बदलले आहे), हा सांताक्रूझ येथील महाविद्यालयात बीएमएमच्या पहिल्या वर्षात शिकत होता. जयच्या पालकांनी, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ‘नमुने’ वरील त्याच्या मित्रांनी त्याला आत्महत्या करण्यास उद्युक्त केले असल्याचा आरोप केला आहे. याबाबत तुलिंग पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

सात ते आठ वर्गमित्र असलेला ‘नमुने’ हा ग्रुप जयच्या एका वर्गमित्राने जुलै 2019 मध्ये सुरु केला होता. जयच्या पालकांनी असा आरोप केला आहे की, या ग्रुपवर जयची अनेकवेळा चेष्टा केली गेली आहे. तसेच त्याला ग्रुपमधून काहीवेळा ब्लॉकही केले गेले होते. त्यानंतर जयने इतर मित्रांना वैयक्तिक मेसज करून, आपल्याला ग्रुपमध्ये पुन्हा समाविष्ट करून घ्यावे अशी विनंती केली होती. इतकेच नाही तर या ग्रुपवर त्याच्या मित्रांनी त्याला आत्महत्येचे उपायही सूचित केले होते.

त्यानंतर गेले दोन आठवडे जयने कॉलेजला जाणे टाळले होते. आई-वडिलांनी अनेकवेळा विचारूनही त्याने काहीच सांगितले नाही. अखेर शुक्रवारी नैराश्येतून त्याने आत्महत्या केली.

दरम्यान, युवा सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये अशा प्रकारचे, ‘पॅसिव्ह अग्रेशन’ मोठ्या प्रमाणत वाढल्याचे, तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा वाढत्या घटना पाहता आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात, ‘नेट शिष्टाचार’ समाविष्ट करण्याची गरज भासत आहे. एखाद्या ‘मुलाला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून वगळणे’ ही गोष्ट त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण करू शकते. आपण या ग्रुपसाठी योग्य नाही असा समज तो मुलगा करून घेऊ शकतो. याची परिणीती आत्महत्यासारख्या कृतीत घडू शकते.