उद्धव ठाकरे अयोध्या दौरा (Photo Credit :Shivsena Facebook page)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पवित्र अयोध्यानगरीत प्रस्थान करणार आहे. तर रामाचे नाव घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येचा दोन दिवस दौरा करणार आहे. या दौऱ्याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून सर्वजण जय श्रीराम अशा घोषणा करत आहेत. अयोध्येत भगव्याची लाट आली असून तब्बल 26 वर्षांनी रामनगरी दुमदुमलेली पाहायला मिळत आहे. तसेच अयोध्यानगरीत उद्धव ठाकरे काय  बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 निवडणुक जशी जवळ येत आहे तसा राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेकडून उचलून धरला जात आहे. तसेच आज रामनरीत रॅलीचे अयोजन करण्यात आले असून उद्धव ठाकरे उद्या सभा घेणार असल्याची शक्यता  वर्तविली जात आहे. या दौऱ्यादरम्यान, उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरीवरील मातीचा कलश घेऊन जाणार आहेत. तर संपूर्ण रामनगरीत शिवसेनेचे 'हर हिंदू की यह पुकार, पहिले सरकार' असे होर्डिंग लावले गेले आहेत. तसेच  24 तास सातत्याने येथे सुरक्षारक्षक देखरेखीसाठी ठेवले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकाला एक विशिष्ट ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यादौऱ्यासाठी संतमहंत आणि अयोध्यावासियांकडून जंगी तयारी करण्यात आली आहे. तर अयोध्येमध्ये संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे आणि विश्वनाथ महाडेश्वर दाखल झाले आहेत.  तसेच शिवसेनेच्या रॅलीसाठी यूपीच्या व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात होता. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या व्यापाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हे लोक आता पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी उभे राहिले आहेत. ( हेही वाचा - 'मंदिर पाडायला आम्हाला 17 मिनिटं लागली,मग कायदा करायला इतका वेळ का ?' - शिवसेना खासदार संजय राऊत )
तर आज अयोध्येमधील क्षत्रिय, ब्राम्हण, वैश्य  आणि भोजपूरी समाज अशा वेगवेगळ्या समाजाकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच दुपारी 3 वाजता रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5 च्या दरम्यान शरयूच्या काठावर जाऊन आरती करणार आहेत. तर रविवार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9  वाजता  उद्धव ठाकरे राम जन्मभूमीत रामललांच दर्शन घेणार आहेत.