संजय राऊत अयोद्धा पत्रकार परिषद Photo Credit: ANI

'पहले मंदिर फिर सरकार' या शिवसेनेच्या पवित्र्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेली अनेक वर्ष सुरु असलेला राम मंदिराचा (Ram Mandir) मुद्दा आता पुन्हा तापू लागला आहे. वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याच्या अध्यादेश काढला जावा यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. अयोद्धेमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अयोद्धा दौऱ्याची माहिती दिली. सोबातच 'मंदिर पाडायला आम्हाला 17 मिनिटं लागली,मग सरकारला कायदा करायला इतका वेळ का लागत आहे, असा सवाल विचारला आहे.

राष्ट्रपती भवनापासून उत्तर प्रदेशापर्यंत भाजपचे सरकार आहे. संसदेत राममंदिराला पाठिंबा देणारे अनेक खासदार आहेत. जे राम मंदिराला विरोध करतील त्यांना देशात फिरणे मुश्किल होईल, असा इशारादेखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. केंद्र सरकारने राम मंदिरासाठी अध्यादेश काढावा. शिवसेना त्यांना पाठिंबा देईल. असेही राऊत म्हणाले आहेत.

24 आणि 25 नोव्हेंबर असा उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. आज मुंबईहून अनेक शिवसैनिक रेल्वेने आयोद्धेला रवाना झाले आहेत. यादरम्यान मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. कॉग्रेस आणि इतर विरोधकांनी मात्र राम मंदिराचा मुद्दा पुन्हा काढून मत मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.