Shiv Sena chief Uddhav Thackeray's Ayodhya tour: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या दौऱ्यवर जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरमधून शिवनेरी गडावर हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी गडाची माती राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला नेण्याचा शिवसेनेचा मानस आहे. या मातीचा कलश नेण्यासाठी उद्धव ठाकरे शिवनेरीवर आले होते. या वेळी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. ढोल, ताशे, लेझीम आणि तुतारीच्या निनादात शिवसैनिकांनी उद्धव यांचे स्वागत केले.
येत्या २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होणार आहेत. येथे ते शरयुतीरी आरती करतील तसेच, राम मंदिर उभारणीसाठी ते साधू-संत, महंत आणि विविध हिंदुत्त्ववादी संघटनांशी चर्चा करतील. दरम्यान, अयोध्येत ते सभाही घेणार असल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच मुंबईसह महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिक अयोध्येकडे कूच करु लागले आहेत. काही शिवसैनिक अयोध्येत पोहोचलेही आहेत. तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विनायक राऊत आदी नेते मंडळीही आगोदरच अयोध्येत पोहोचली आहे. ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम होणार तिथे शिवसेना नेत्यांनी केलेल्या पूजा, भोजन आणि तयारीचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दरम्यान, वारकऱ्यांच्या एका गटानेही शिवसेनेला आणि उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे. (हेही वाचा, उद्धव ठाकरे अयोध्या दौरा: राम मंदिर मुद्द्यावर अखिल भारतीय आखाडा परिषदेला शिवसेना, विहिंपचे वावडे)
दरम्यान, २५ नोव्हेंबरला शिवसेनेचीच एक प्रमुख शाखा असलेल्या युवासेनेने अयोध्येत येऊ नये असे आदेश उद्धव यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महिलांनी लक्ष्मणरेषा पाळावी असे अवाहनही ठाकरे यांनी केले आहे. 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार' अशी नवी भावनीक साद घालणारी घोषणाही उद्धव यांनी दिली आहे.