उद्धव ठाकरे अयोध्या दौरा (Photo Credit :Shivsena Facebook page)

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली खरी. पण, ही घोषणा प्रत्यक्षात आमलात आणून यशस्वी करुन दाखवणे हे शिवसेनेसाठी एक दिव्य ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोमाने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, हे प्रयत्न सुरु असताना साधू-संतांची सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचे आमंत्रण स्वीकारले नाहीच. पण, शिवसेनेच्या या दौऱ्यावर टीकाही केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला आखाडा परिषदेने आपले साधू-संत विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) कार्यक्रमासही सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अयोध्या प्रश्नी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष राजकीय खेळी करत असल्याचा आरोप अखिल भारतीय आखाडा परिषदेने केला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत होणाऱ्या शिवसेना आणि विहंपच्या कार्यक्रमाबाबत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. 'हिंदुत्त्ववादी पक्ष आणि संघटनांना राम मंदिर आणि रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. केवळ राजकारणासाठीच या दोन्ही संघटना आयोध्येत कार्यक्रम करत आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारणे हेच जर हिंदुत्त्वावादी पक्ष आणि संघटनांचं ध्येय असेल तर, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन कशासाठी?' असा सवाल उपस्थित करत नरेंद्र गिरी यांनी अयोध्येत होणाऱ्या शिवसेना आणि विहिंप यांच्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमावर टीका केली आहे. (हेही वाचा, शिवसेनेच्या भूमिकेनंतर अनेकांचे कोमेजलेले मेंदू हालचाल करू लागले; संघ परिवाराच्या अयोध्येतील ‘हुंकार रॅली’वरुन उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी)

दरम्यान, शिवसेना आणि विहिंप यांच्या कार्यक्रमामुळे अयोध्येत मंदिर बांधण्याबाबत कोणताच तोडगा निघणार नसल्याचेही महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना, विहिंपच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेल्या आखाडा परिषदेने ४ आणि ५ डिसेंबरला अयोध्येत राम मंदिराच्या मुद्द्यावर स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. तसेच, या बैठकीला अयोध्या प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांच्यासही इतरही मुस्लीम धर्मगुरूंना निमंत्रण देण्यात आले आहे.