Shivsena 55th Anniversary: अंगावर याल तर हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत; वर्धापनदिनी शिवसेनेचा भाजपला इशारा
Shiv Sena Bhavan | (File Photo)

शिवसेना पक्ष आज आपला 55 वा वर्धापन दिन (Shivsena 55th Anniversary) साजरा करत आहे. शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दैनिक सामना (Dainik Saamana) संपादकीयात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त बरेच काही लिहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांची आठवण करुन देत शिसेनेला आव्हान देणाऱ्यांना इशाराही देण्यात आला आहे. प्रामुख्याने दोन दिवसांपूर्वीच शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) समोर झालेल्या भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमधील राड्याचा संदर्भ देत म्हटले आहे की, 'ही शिवसेना (Shiv Sena) आहे. कोणी विनाकारण अंगावर याल तर हरहर महादेवची गर्जना करत शिवसैनिक हिशेब चुकता करायला मागेपुढे पाहात नाहीत.' शिवसेनेच्या इशाऱ्याचा रोख भाजपकडे असल्याचे दिसते.

शिवसेना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन म्हणजे उत्साह, बुलंद गर्जना आणि प्रचंड गर्दी असा एकंदरीत थाटमाट असतो. पण ‘करोना’ महामारीने या सगळ्यांवर सलग दुसऱ्या वर्षीही पाणी ओतले आहे. संपूर्ण देशाचीच स्थिती करोनामुळे गंभीर, तितकीच नाजुक बनली आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आज फक्त निराशा किंवा वैफल्यच दिसत आहे. उद्योग क्षेत्राला फटका बसल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार गमावला आहे. नोकऱ्याच गेल्याने त्याचा परिणाम शेवटी कष्टकऱ्यांच्या ‘चुली’वर झाला. लोकांच्या चुली विझताना दिसत आहेत. शिवसेनेने स्थापनेपासून लोकांच्या चुली पेटविण्याचा महायज्ञच आरंभला होता. शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत हक्काची रोजीरोटी मिळावी, त्याला सन्मानाने जगता यावे यासाठीच झाली. (हेही वाचा, Shiv Sena-NCP Alliance: 'महाराष्ट्र हितासाठी शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र यावे लागेल', महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्षाचा काँग्रेसला सूचक इशारा)

गेल्या दीड वर्षात लोकांनी गमावलेल्या नोकऱ्या हाच चिंतेचा आणि संकटाचा विषय बनला आहे. देशाचा व राज्यांचा खजिना फक्त करोनाशी लढण्यातच खर्ची पडला आहे. महाराष्ट्राने अनेक संकटे छाताडावर घेतली. अनेक लढाया पचवल्या. राजकीय, सामाजिक लढ्यांत असंख्य बलिदानेही दिली, पण करोनाची पहिली लाट, मग दुसरी लाट, आता म्हणे तिसरी लाटही दारावर धडका देत आहे. या लाटांनी आम्ही सगळ्यांनीच आपले आप्तस्वकीय, मित्रपरिवारांतले जवळचे लोक गमावले. त्या सगळ्या संकटांवर आणि मृत्यूच्या तांडवावर महाराष्ट्राने जितक्या लवकर नियंत्रण मिळवले तेवढे ना केंद्राला जमले, ना इतर राज्यांना करता आले. गंगेत तरंगणारी प्रेते, गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा, सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले. देशाची प्रचंड मानहानी झाली. पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला. तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच.

आज देशाची घडी अशी आहे की, ती विस्कटली आहे की सुरळीत आहे यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा गावागावांत लोकांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. शिवसेना या संकटकाळात आपल्या सेवाधर्माला जागते आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या मंत्राला जागत शिवसैनिकांनी खासगी रीतीने कोविड सेवा केंद्रे उभी केली. आरोग्य आणि रक्तदान शिबिरे घेतली. गोरगरीबांच्या चुली बंद पडल्या तेथे मोफत अन्नधान्य पुरवठा करून महाराष्ट्र धर्माचे नाव राखले. आजचा काळ असा आहे की, राजकारण, मतभेद चुलीत टाकून महाराष्ट्रासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचीच गरज आहे. राज्यात प्रश्न अनेक आहेत. सगळ्यांत मोठा प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे. सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांसह, युवराज संभाजी राजे, छत्रपती उदयनराजेही मैदानात उतरले आहेत. त्यापाठोपाठ धनगर, ओबीसी बांधवांनीही आरक्षणासाठी शड्डू ठोकलेच आहेत.

देशाची अर्थव्यवस्था कोसळत आहे. देशाचे राजकीय चित्र आज अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे बनत आहे? अर्थात कोणी कितीही गोंधळ आणि गुंतागुंत केली तरी महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेस शिवसेना कदापि तडे जाऊ देणार नाही. शिवसेना स्थापन करतानाच शिवतीर्थावरील पहिल्याच विराट सभेत शिवसेनाप्रमुखांनी एक मंत्र दिला, तोच महाराष्ट्राचा भक्कम पाया आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ”मराठा-मराठेतर, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, घाटी-कोकणी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारू!” या एकजुटीच्या वज्रमुठीतच शिवसेनेच्या ५५ वर्षांचे सार सामावलेले आहे. शिवसेनेचे मराठीपण जसे तळपणाऱ्या तेजासारखे आहे तसेच हिंदुत्वाचे कवचही बुलंद आहे. शिवसेनेने आपले रंग सरड्यांसारखे बदलले नाहीत. कष्टकरी, शेतकरी, नोकरदारवर्गाने शिवसेनेला भरभरून पाठबळ दिले ते याच सचोटीच्या राजकारणामुळे.

महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत. शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील!