Shiv Sena-NCP Alliance: 'महाराष्ट्र हितासाठी शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र यावे लागेल', महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्षाचा काँग्रेसला सूचक इशारा
Sharad Pawar, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये घटक पक्ष असलेलेल्या काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाबाबत भाष्य केले. यावर शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Saamna Editorial) संपादकीयातून काँग्रेसला सूचक इशारा देत भाष्य करण्यात आले आहे. भाजपनेही या आधीच महाराष्ट्रात स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस भाजप यांच्यासारखे पक्ष जर स्वबळावर लढत असतील तर महाराष्ट्र हितासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्र (Shiv Sena-NCP Alliance) विचार करुन लढावेल लागेल. याबाबतचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व शरद पवार ( Sharad Pawar) यांनी केलेच आहे, अशी आठवण करुन देत सामना संपादकीयातून काँग्रेसला इशारा देण्यात आला आहे.

सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

  • महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. एका बाजूला राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्दय़ाने जोर धरला आहे. कोल्हापुरात सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. धनगरांना वेळीच आरक्षण मिळाले नाही तर पंढरपुरातील विठोबा माऊलीची महापूजा रोखण्याची भाषा सुरू झाली आहे. ‘ओबीसी’चे पुढारीही रस्त्यांवर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात कोरोनाचा धुमाकूळ पूर्णतः थांबलेला नाही. या परिस्थितीतही काही लोकांना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ‘ग्रस्त’ असतील असे कधीच वाटले नव्हते. (हेही वाचा, Shiv Sena On Central Government: जे आपण कमावले नाही ते विकून खायचे हा कोणता धर्म? शिवसेनेचा केंद्र सरकारवर हल्ला)
  • महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे.
  • ज्याच्यापाशी 145 आमदारांचे बहुमत आहे त्याचे सरकार बनेल व त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे मत नानांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे, तेही खरेच आहे. संसदीय लोकशाही हा बहुमताच्या आकडय़ांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला जमेल तो गादीवर बसेल. राजकारणात इच्छा, महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? ‘मी पुन्हा येईन’ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. ते आले नाहीत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे 105 आमदारांचे बळ वाया गेले आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवले. त्यामुळे 2024 चा हवाला आता कोणीच देऊ नये. नाना पटोले यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱया स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.
  • नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा करताच भाजपचे तालेवार नेते रावसाहेब दानवे यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची चावी फिरवली. दानवे यांचे म्हणणे आहे की, पुन्हा शिवसेना -भाजपा युती शक्यच नाही. त्यामुळे स्वबळावरच लढावे लागेल. दानवे पुढे म्हणतात ते महत्त्वाचे, राजकारणात कोण, केव्हा आणि कधी जवळ येईल ते सांगता येत नाही. रावसाहेबांचे हे विधान सोळा आणे सत्य आहे. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रूही नसतो आणि मित्रही नसतो. महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यातून हेच सिद्ध झाले. दानवे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली हे बरे झाले. दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. राज्यातील भाजपमध्ये त्यांचे वजन आहे. त्यामुळे दानवे बोलतात ते वायफळ नाही हे मान्यच करावे लागेल,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
  • 2024 चे मैदान अद्याप लांब आहे, पण प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा अचानक करू लागले आहेत. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीपूर्व लावून घेण्याच्या हालचाली कोणी करत आहे काय? भाजपच्या जवळ जाईल व एकत्र लढतील असा पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही. त्यामुळे भाजपास स्वबळावर लढणे अपरिहार्य आहे. दानवे यांनी तेच सत्य मांडले.

दरम्यान, शिवसेना-भाजप हे एकमेंकाचे मित्रपक्ष. गेली अनेक वर्षे हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात युतीद्वारे लढत होते. गेल्या काही काळात त्यात वितुष्ट आले आणि हे दोन्ही पक्ष स्वतंत्र झाले. तेव्हापासून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार कुरघोडी करत असतात. काल (16 जून) शिवसेना भवन कार्यालयासमोर झालेला राडाही त्यातलाच प्रकार होता, असे राजकीय अभ्यासक सांगतात.