शिवनेरी प्रमाणे एस टी बसमध्येही लवकरच व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा, प्रवाशांना मिळणार लाईव्ह अपडेट्स
ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये गाव तेथे एसटी आहे. खेड्या खेड्यामध्ये पोहचण्यसाठी एसटी महामंडळाच्या बस आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी एस टी बस हे वाहतूकीचं महत्त्वाची आहे. आता प्रवाशांना एसटी बसची वाट बघत, तिष्ठत रहावं लागू नये म्हणून लवकरच व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (Vehicle Tracking System) बसवण्याचा विचार केला जात आहे. सुरूवातीला शिवनेरी बसमध्ये ही सुविधा बसवली जाणार आहे. त्यानंतर इतर एस टी बसमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. ऑगस्ट 2019 महिन्यापासून त्याला सुरूवात होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुमारे 18 हजार बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.

एस टी महामंडळ मागील काही महिन्यांपासून व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा वर काम करत आहे. एस टी बसचे वेळापत्रक समजावे, बस आता नेमकी कुठे आहे याचा अंदाज यावा यासाठी ही नवी यंत्रणा फार महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. नियोजित बस थांब्यावर बस थांबली की नाही, बसला उशिर होत असल्यास तो का होतोय? याची रिअल टाईम माहिती देखील आता महामंडळाला मिळणार आहे. तसेच वेळापत्रक विस्कळीत होण्यामागे बस वाहक, चालक जबाबदार असल्यास त्यावर योग्य कारवाई करण्याचीही स्पष्टता आता महामंडळाकडे येणार आहे.

प्रवासांना बसची सद्य स्थिती पाहण्यासाठी बस स्थानकांमध्ये, बस डेपो मध्ये खास एलसीडी स्क्रिन लावल्या जाणार आहेत. सोबतच एसटीच्या मोबाईल तिकीट आरक्षण अ‍ॅप मध्येही लाईव्ह स्टेट्स पाहता येणार आहे. नाशिक मधील बस सोबत शिवनेरी बसचं लाईव्ह स्टेट्स पाहण्याची सोय सुरूवातीच्या टप्प्यात प्रवाशांना खुली करून दिली जाणार आहे.