Shiv Bhojan Yojana (PC- PTI Wikimedia Commons)

महाराष्ट्रातील गरजू जनतेला सकस अन्न कमी किंमतींत मिळवून देण्याच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांच्या सरकारने शिवभोजन थाळीचा (Shiv Bhojan Thali) महत्वकांक्षी उपक्रम सुरु केला होता. या उपक्रमाला आता मिळत असणाऱ्या भरघोस प्रतिसादाला पाहता या उपक्रमाची व्याप्ती आणि विस्तार वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यानुसार, यापुढे शिवभोजन थाळीच्या रोजच्या उपलब्धीमध्ये दुप्पट वाढ करण्यात येणार आहे, म्हणजेच यापुढे 18 हजाराच्या ऐवजी 36 हजार थाळ्या दिवसाला उपलब्ध करून देण्याचा ठाकरे सरकारचा मानस आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागास सूचना दिल्या असून येत्या अर्थसंकल्पात याविषयी तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे.

असे झाल्यास शिवभोजन केंद्रावर प्रतिदिन किमान 75 तर कमाल 200 थाळ्या उपलब्ध असतील. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंट वरून माहिती देण्यात आली आहे. शिवभोजन थाळी: तुमच्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मिळणार 10 रुपयांत जेवण

शिवभोजन थाळीचा हा उपक्रम सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राबवण्यात आला होता, यानुसार मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, कोकण, विदर्भ, मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यातील मुख्यालयात शिवभोजन मिळणार होते. या थाळीचा दर शहरात 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये असणार होता, मात्र जनतेला फक्त 10 रुपये द्यावे लागतील, उर्वरित रक्कम सरकारकडून अनुदान स्वरूपात देण्यात येईल अशी योजना आहे. काहीच दिवसात या थाळीला विक्रमी प्रतिसाद मिळू लागला. पहिल्याच दिवशी तब्बल 11, 274 थाळींची विक्री झाली होती. त्यामुळे आता गरीब व गरजूंपैकी अधिकाधिक जणांना याचा लाभ व्हावा या हेतूने विस्तार वाढवण्यात येणार आहे.

CMO ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेच्या शिवभोजन थाळी प्रमाणेच भाजपकडून दीनदयाळ थाळी सुरु करण्यात आली आहे. जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त, भाजपने 'दीनदयाळ थाळी' योजना सुरू केली असून . 26 जानेवारी रोजी, 10 रुपयांच्या 'शिवभोजन थाळीच्या तुलनेत भाजपाच्या 30 रुपये किंमतीच्या 'दीनदयाळ थाळी' मध्ये अधिक व्हरायटी असणार असल्याचे समजतेय. पंढरपूर येथून या योजनेचा प्रारंभ झाला आहे.