Raj Thackeray | X @ANI

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी (UNESCO World Heritage List) मध्ये महाराष्ट्रातील शिवरायांच्या 11 तर तामिळनाडू मधील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा काल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे स्थापत्यशास्त्राचा नमुना तर आहेतच पण त्यासोबतच महाराष्ट्रासाठी शिवप्रेमींसाठी हे किल्ले शौर्याचे प्रतिक आहे. मराठीप्रेमींसाठी हा अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडीयातून यावर सविस्तर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र सरकार आणि मराठी जनतेचे कौतुक आणि अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे पण त्यासोबतीने सरकारला अलर्ट देखील केले आहे. युनेस्को ने जसा या गडकिल्ल्यांचा समावेश वारसा यादीत केला आहे तसा ते निकष न पाळल्यास काढून देखील घेतात त्यामुळे गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यावर अधिक लक्ष द्यावं असं म्हटलं आहे.

राज ठाकरे यांची सरकार कडे मागणी

राज ठाकरे यांनी सरकारचे अभिनंदन करताना पोस्ट मध्ये सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका ! त्यात जात - धर्म पहाण्याची गरज नाही असं म्हटलं यावेळी त्यांनी जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं याची दोन उदाहरणं देखील दिली आहेत. ओमान मधल्या अरेबियन आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीला युनेस्को जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला नंतर तो मागे देखील घेतला. जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो २००९ ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. असं आवाहन केलं आहे. नक्की वाचा: UNESCO World Heritage List: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी मध्ये रायगड ते जिंजी किल्ल्यांचा समावेश; शिवरायांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचणार.

राज ठाकरेंप्रमाणेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील सरकारला गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अलर्ट केले आहे. युनोस्को जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देते मात्र जतन करण्यासाठी निधी देत नाही त्यामुळे सरकारने आता या गडकिल्ल्यांच्या डागडुजी कडेही लक्ष द्यावं अशी विनंती त्यांनी केली आहे.