शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मुंबईच्या दुकानातून आणि रस्त्यावरुन अनधिकृत पुतळे (Mannequins) हटवले आहेत. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी कपड्यांच्या दुकानांमध्ये अंतःवस्त्र परिधान केलेले पुतळे परवानगी शिवाय ठेवण्यास मनाई केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. शिवसेनेच्या सुमारे 30 महिला कार्यकर्त्यांनी शनिवारी विर्लेपार्ले येथील रस्त्यावरुन दुकानाबाहेर ठेवलेले, झाडाला टांगलेले पुतळे हटवले आहेत. (पुतळ्यांना अंतर्वस्त्र घालून विक्रीसाठी उघड्यावर ठेवण्यास बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय)
तसंच हे पुतळे रस्त्यावर न ठेवता दुकानात ठेवावे, असेही महिला कार्यकर्त्यांनी दुकानदारांना सांगितले. अंतःवस्त्र धारण केलेले पुतळे दुकानांसमोर ठेवणे, हे महिलांसाठी लाजिरवाणे होते. त्याचबरोबर रस्त्यावरुन चालणाऱ्या लहान मुलांचे लक्ष विनाकारण वेधले जाते, असे विर्लेपार्ले येथील शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या रजनी मेस्त्री यांनी सांगितले.
तर दुसऱ्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या की, दुकानात कोणत्या प्रकारेचे सामान, वस्तू विकल्या जातात हे समजण्यासाठी दुकानाचे नाव पुरेसे आहे आणि त्यामुळे अंतःवस्त्राचे उघडपणे प्रदर्शन करण्याची गरज नाही. त्याचबरोबर सेनेच्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी देखील शहराच्या दुसऱ्या भागातही अशाप्रकारे कारवाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले.