रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार? बुरखाबंदी मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेचा प्रश्न
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान | (Photo courtesy: archived, edited, representative image)

फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा सवाल शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना विचाराला आहे. पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार? या मथळ्याखाली लेख लिहिला आहे. या लेखात 'हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत. फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? असा सवाल विचारला आहे. (हेही वाचा, शिवसेना उपनेतेपदी प्रियंका चतुर्देवी यांची नियुक्ती)

दरम्यान, याच लेखात उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले. ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांनी ते केले. त्यांनी एका रात्रीत बुरखा बंदी केली. चेहरा झाकणार्‍या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तीची ओळख पटण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत अशा गोष्टींवर प्रतिबंध केला जात असल्याचे श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी जाहीर केले. फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.