Dhal Talwar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शिंदे गटाला 'ढाल तलवार' (Dhal Talwar) हे निवडणूक मिळाले आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनूष्यबाण हे दोन्ही काही काळासाठी निवडणूक आयोगाने गोठवले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) वेगवेगळी नावे आणि चिन्हे घेण्यास सांगितली होती. यावर उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि 'मशाल' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले. परंतू, पहिल्या फेरीत शिंदे गटाने दिलेले एकही चिन्ह निवडणूक आयोगाने स्वीकारले नाही. त्यामुळे शिंदे गटाला दुसऱ्यांदा चिन्ह सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार नव्या चिन्हांचे पर्याय शिंदे गटाने आयोगासमोर ठेवले होते. त्यापैकी एक चिन्ह आयोगाने शिंदे गटाला दिले.

शिंदे गटाने नव्याने सादर केलेल्या निवडणूक चिन्हांमध्ये 'पिंपळाचे झाड', 'तळपता सूर्य' आणि 'ढाल तलवार' हे पर्याय दिले होते. त्यापैकी शिंदे गट 'तळपता सूर्य' चिन्हासाठी आग्रही होता. परंतू, केवळ सूर्य आणू ऊगवता सूर्य ही दोन्ही चिन्हे आगोदरच काही राजकीय पक्षांना दिली आहेत. सूर्य हे चिन्ह झोराम नॅशनल पार्टीचे चिन्ह आहे. तर उगवता सूर्य हे चिन्ह डीएमके पक्षाचे अधिकृत चिन्ह आहे. त्यामुळे हे चिन्ह गोंधळ निर्माण करु शकते, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला 'ढाल तलवार' हे चिन्हही शस्त्र असले तरी हे चिन्ह आगोदर 'पिपल डेमोक्रेटीक मूव्हमेंट' या पक्षाकडे होते. या पक्षाची मान्यता 2004 मध्ये गोठविण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या 'फ्री सिंबॉल' यादी हे चिन्ह होते. त्यामुळे हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले. (हेही वाचा, Shiv Sena Symbol Controversy: एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा धक्का; नाव मिळाले पण चिन्हाचं काय?)

दरम्यान, शिंदे गटाला 'ढाल तलवार' हे चिन्ह मिळताच, मंत्री सुभाष भुमरे, आमदार भरत गोगावले, यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांनी आनंद व्यक्त केला आहे. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तलवार आणि घाव वाचविण्यासाठी ढाल, असे आमचे चिन्ह आहे. आमचे चिन्ह आग लावण्यासाठी नाही, असा टोला भरत गोगावले यांनी ठाकरे गटाला लगावला.

दुसऱ्या बाजूला, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ढाल तलवार चिन्ह मिळाल्याबद्दल अभिनंदन करत अंधारे यांनी म्हटले की, असे म्हणतात की, एकाच म्यानात दोन तलवारी राहात नाहीत. त्यामुळे आता भाजप नेमकी कोणाची तलवार वापरणार? देवेंद्र फडणवीसांची की, एकनाथ शिंदे यांची? भाजपने फडणवीसांचीतलवार वापरली तर शिंदे यांच्या तलवारीचे करणार काय? असे अधारे म्हणाल्या. शिवाय ढालीची त्यांना गरजच काय? जे लोक मुळातच बदमाश आहेत, जे लोक आगोदच फितूर आहेत त्यांच्याशी आणखी बदमाशी, फितूरी कोण करणार? असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, शिंदे गटाला मिळालेले चिन्ह म्हणजे त्यांच्याकडे गद्दारीची तलवार आणि फितूरीची ढाल आली आहे.