Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे घेणार दर्शन
Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी गुवाहाटी येथील मां कामाख्या देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गुवाहाटीमध्ये आल्यानंतर बंडखोर नेते पहिल्यांदाच हॉटेलबाहेर दिसले. महाराष्ट्रात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी गुरुवारीच फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी अधिवेशन बोलावण्यासाठी पत्र लिहिले आहे. दरम्यान, यानंतर मुंबई ते गुवाहाटीकडे हालचाली खूप वाढल्या आहेत.  अनेक दिवसांपासून गुवाहाटीमध्ये वास्तव्यास असलेले शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईला येण्याची शक्यता आहे.

बंडखोर आमदार गोव्यात परतण्याच्या पार्श्वभूमीवर एलजीबीआय विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी चारच्या सुमारास ते गोव्याकडे प्रयाण करतील.  गोव्यातील हॉटेल ताजमध्ये 71 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.  दरम्यान, एलजीबीआय विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. हेही वाचा Kishori Pednekar: अजित पवार यांनीच सरकार पाडण्यास सांगितले, किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्रात उल्लेख

आम्ही उद्या मुंबईत पोहोचू. 50 आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे 2/3 बहुमत आहे. आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही. आम्ही सर्व गोष्टींमध्ये उत्तीर्ण होऊ आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते, असे गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंनी सांगितले.  तसेच शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. त्याबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळीदेखील आम्ही आमदार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विधानसभेत फ्लोअर टेस्टसाठी ते गुरुवारी मुंबईला येणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना गुरुवारी सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगितले आहे.