'हिंदुस्थानने अमेरिकेचा चोंबडेपणा चालू दिला नाही हे बरेच झाले', शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया
Donald Trump and Uddhav Thackeray | (Photo credit: archived, edited, symbolic images)

'भारतात धर्माच्या नावावर हिंसाचार वाढला असून हिंदू संघटनांनी अल्पसंख्याक आणि मुस्लिमांवर हे हल्ले केले आहेत' हा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप भारताने फेटाळून लावला. भारताच्या अंतर्गत प्रश्नावर वक्तव्य करण्याच्या अमेरिका परराष्ट्र मंत्रालय (US Foreign Ministry) करत असलेल्या उद्योगावर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात (Saamana) लिहिलेल्या लेखातही ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त करत 'हिंदुस्थानने अमेरिकेचा चोंबडेपणा चालू दिला नाही हे बरेच झाले', असे म्हटले आहे.

' अमेरिकेचा चोंबडेपणा' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, हिंदू संघटनांनी अल्पसंख्याक तसेच मुस्लिमांवर हल्ले केले असा ‘साक्षात्कार’ अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला झाला आहे. हिंदुस्थानच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खुपसण्याचा अधिकार अमेरिकेला दिला कोणी? हिंदुस्थानने हा आरोप फेटाळून अमेरिकेचा चोंबडेपणा चालू दिला नाही हे बरेच झाले. हिंदुस्थानातील धार्मिक सलोखा आणि शांतता ही येथील सरकारची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पाडण्यास सरकार समर्थ आहे. ट्रम्प प्रशासनाने आधी आपल्या पायाखाली काय जळते आहे ते पाहावे. (हेही वाचा, अमेरिकेचा भारताला इशारा, 'रशियाकडून संरक्षण एस-400 प्रणाली घ्याल तर CAATSA प्रतिबंध लादू')

'अमेरिकेत सरकार कोणाचेही असो, पण ते जगाचे स्वयंघोषित ‘कैवारी’ असते. आपणच एकमेव जागतिक महासत्ता आहोत आणि संपूर्ण जगाला शहाणपणा शिकविण्याचा मक्ता फक्त आपल्यालाच आहे असाच प्रत्येक अमेरिकन सत्ताधाऱयाचा खाक्या असतो. त्यामुळे हिंदुस्थानातील अल्पसंख्याक आणि मुस्लिमांच्या सुरक्षेचा कळवळा ट्रम्प सरकारच्या परराष्ट्र खात्याला आला असेल तर त्यात अनपेक्षित असे काहीच नाही', असेही उद्धव ठाकरे यांनी लेखात म्हटले आहे.