Hathras Case: हे लोकशाहीवर 'गँगरेप' होत असल्याचेच लक्षण- शिवसेना
Hathras rape victim cremated on Wednesday | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली. तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगिंची विधाने आम्ही पाहिली आहे. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस (Hathras), बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्त्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? असा सवाल शिवसेना (Shiv Sena) मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. तसेच, हाथरस पाठोपाठ बलरामपूर येथेही सामूहिक बलात्काराचे (Gangrape) प्रकरण झाले. पण तरीही ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलाव्या. बलात्कारच झाला नाही तर विरोधकांनी बोंबलायचे कशाला? असे सरकारच बोंबलत आहे. बलात्कारच झाला नाही तर रात्रीच्या अंधारात अंधारात मुलीचा मृतदेह पेट्रोल ओतून का जाळला? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अडवलेच, पण त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले. देशातील एका प्रमुख विरोधी पक्षाच्यानेत्यास असे वागवणे, अपमानित करणे हे लोशाहीवर 'गँगरेप' होत असल्याचेच लक्षण आहे, अहे अशा शब्दात शिवसेना मुखपत्र दै. सामना (Saamna Editorial) संपादकीयामधून हल्ला चढविण्यात आला आहे.

'ए अबले, माफ कर; हे तुमचे हिंदुत्व!' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात सामना संपादकीयात म्हटले आहे की, राहुल गांधी हे महान इंदिरा गांधी याचे नातू व तडफदार राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. इंदिरा व राजीव गांधी यांनी देशाच्या सार्वभौमत्वासाठी हौतात्म्य पत्करले. पण देशासाठी रक्त तर सोडाच, घामाचा, त्यागाचा एक थेंबही ज्यांनी सांडला नाही अशा सत्ताधीशांच्या आदेशाने राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यात आला. महिलांवरील बलात्कार अत्याचारांबाबत आवाज उठवाल तर याद राखा, असेच जणून योगी सरकारने बजावलेआहे. (हेही वाचा,Hathras Case: हाथरस घटना प्रकरणी सीएम योगी आदित्यनाथ सरकारची मोठी कारवाई; एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना केले निलंबित )

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संन्याशी आहेत. ते भगव्या कपड्यांत वावरतात. पंतप्रधान मोदी हे तर फकीर आहेत. पण मोदी यांना जगातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा आहे. योगी यांनाही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगींची सुरक्षा मागे घेतली तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत. पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही. बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे नराधम कृत्य हिंदुत्त्वाच्या कोणत्या परंपरेत बसते? असा सवालही सामना संपादकीयातून शिवसेनेने विचारला आहे.