Lockdown: राज ठाकरे यांच्या भूमिकेवर शिवसेना मुखपत्रातून प्रश्नचिन्ह
Raj Thackeray | (Photo credit : Facebook)

कोरोना व्हायरस ( Coronavirus) संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात महसूल वाढविण्यासाठी सरकारने राज्यातील 'वाईन शॉप (Wine Shops) सुरु' करावित अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली. या मागणीवर राज्यातून साधक बाधक चर्चा सुरु असतानाच शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातून (Daily Saamana Editorial) राज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? 'की' 'तळीरामां'च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली, असा सवाल सामना संपादकीयातून व्यक्त करण्यात आला आहे.

'वाईन, डाईन आणि फाईन...व्हा! राज बाबू' या मथळ्याखाली लिहिलेल्या दै. सामनातील संपादकीयात म्हटले आहे की, राज ठाकरे यांच्या या मागणीमुळे घरोघरच्या रिकाम्या बाटल्या, प्यालेही फसफसू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मागणीत दम आहे व त्यांनी अनेक जिवांच्या कोरडय़ा घशांची काळजी घेणारी मागणी केली आहे. त्यामुळे हे ‘कोरडवाहू’ श्रमिक लोक राज ठाकरे यांची ‘तळी’ उचलून धरतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण ही मागणी करून दोन शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. (हेही वाचा, Lockdown: 'महसूल वाढीसाठी वाईन शॉप सुरु करा'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र)

दरम्यान, महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही मागणी असली तरी एक समस्या आहेच. कारण ‘लॉकडाऊन’मुळे ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे फक्त ‘वाइन शॉप’च बंद आहेत असे नाही तर राज्यातील मद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद पडले आहेत. त्यामुळे आधी हे कारखाने सुरू करावे लागतील तेव्हाच त्यांचा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरू होऊन दारूचा महसूल मिळत नसतो, असेही दै. सामना संपादकीयात म्हटले आहे.