Kirit Somaiya and Shiv Sena MLA Sunil Raut | (Photo Credits-file photo)

Lok Sabha Elections 2019: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ (Mumbai North East Constituency) हा भाजपसाठी एक आव्हानच बनला आहे. या मतदारसंघातून किरिट सोमय्या (Kirit Somaiya) हे विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप (BJP) तिकीटावर दुसऱ्यांदा उमेदवारी कारायला सोमय्या इच्छूक आहेत. मात्र, स्थानिक शिवसैनिकांचा त्यांना प्रचंड विरोध आहे. आता तर हा विरोध अधिकच टोकाला गेला आहे. शिवसेना (Shiv Sena) आमदार सुनील राऊत (MLA Sunil Raut) यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. भाजपने जर किरीट सोमय्या यांना तिकीट दिले तर, आपण सोमय्या यांच्याविरोधात अपक्ष लढू, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या उमेदवारीचे काय करायचे? असे सवाल भाजपसमोर निर्माण झाला आहे. काहीही झाले तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. आपण सोमय्या यांचा पराभवच करु, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 'आमचा शिवसेना पक्षप्रमुखांवर विश्वास आहे. त्यामुळे सोमय्या यांना उमेदवारी मिळणार नाहीच. पण ती जर मिळाली. तर, गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुच' असे राऊत यांनी म्हटले आहे.

सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेना पक्षासोबत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी युती केली. स्वतंत्र लढण्याची पूर्ण मानसिकता केलेल्या कार्यकर्त्यांसाठी युतीचा निर्णय अद्यापही फारसा पचणी पडला नाही. मात्र, तरीही दोन्ही पक्षांनी युतीचे जागावाटप करुन प्रचाराला प्रारंभही केला. असे असले तरी, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्याप कायम आहे. स्थानिक शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला ठाम विरोध आहे. काहीही झाले तरी सोमय्या यांना उमेदवारी नको, अशी स्थानिक शिवसैनिकांची भूमिका आहे. काही शिवसैनिकांनी तर 'चौकीदार तुझसे बैर नही पर, सोमय्याकी खैर नही' अशी मोहीमच सुरु केली आहे. (हेही वाचा, रायगड: बॅ. ए. अर. अंतुले यांचे चिरंजीव नविद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश; सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढल्या)

एएनआय ट्विट

गेल्या चार वर्षांच्या सत्ताकालात खासदार असताना सोमय्या यांनी शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणावर छळ केला आहे. त्यामुळे राज्यात जरी शिवसेना भाजप युती असली तरी, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मात्र भाजप उमेदवार किरीट सोमय्या यांचा पराभवच होईल, असे स्थानिक शिवसैनिकांनी बजावले आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या उमेदवारीचा तिढा भाजप कसा सोडवते याबाबत उत्सुकता आहे.