Shivsena (Photo Credits: PTI)

Lok Sabha Elections 2019: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते बॅ. ए. आर. अंतुले (A.R. Antulay ) यांचे चिरंजीव नविद अंतुले (Navid Antulay ) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला आहे. नविद अंतुले हे तसे राजकारणात फारसे सक्रीय नाहीत. मात्र, बॅ. ए. आर अंतुले (A. R. Antulay)  यांना माननारा एक मोठा वर्ग रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे नविद यांच्या प्रवेशाचा रायगड जिल्हा आणि रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला फायदा होऊ शकतो. नविद यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यासमोर मात्र अडचणी उभ्या करु शकतो.

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गीते हे उमेदवार आहेत. गीते हे रायगडचे विद्यमान खासदार आहेतच. शिवाय, केंद्रीय मंत्रीपद मिळालेले एकमेव शिवसेना खासदारही आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथून शिवसेनेचे अनंत गीते बहुमताने निवडून येतात असा आजवरचा इतिहास. मात्र, गेल्या काही वर्षात त्यात काहीसा बदल झाला. 2014 च्या निवडणुकीत गीते यांनी गड राखला मात्र त्यांचे मताधिक्य कमी झाले. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश)

गीते यांचे 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी घटलेले मताधिक्य ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट ठरु पाहते आहे. त्यामुळे रायगड येथून पक्षाचे नेते सुनिल तटकरे यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सेनेचे गीते विरुद्ध राष्ट्रवादीचे तटकरे असा सामना रंगू पाहात आहे. यातच बॅ. अतुले यांचे चिरंजीव नविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा सामना अधिकच रंगततादर होईल, असे दिसते.