
भाजप (BJP) दिलेला शब्द पाळत नाही. इतरांनाही सत्ता स्थापन करु देत नाही. राज्यपालांनी सर्वांवरच अन्याय केल्याचा घणाघात करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लीलावती रुग्णालयातूनच भाजपवर शरसंधान साधले. लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) राऊत यांच्यावर अँन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली. त्यानंत ते पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी महाराष्ट्र हे काही मध्यावधी निवडणुकांचे दुकान आहे काय? असा सवाल करत नामोल्लेख टाळत भाजपला टोला लगावला तसेच, मध्यवधी निवडणुकांची शक्यता धुडकावून लावली.
एबीपी माझा या वृत्तवाहिणीशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला. संजय राऊत यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वीच राऊत यांनी थेट रुग्णालयातूनच आपली शब्दांची तलवार बाहेर काढली आहे. एकेकाळच्या मित्रपक्षांवर शब्दांचे घणाघाती वार करत संजय राऊत म्हणाले, काही झाले तरी या वेळी शिवसेनेचाच मुख्यमंत्री सत्तेत बसेल. त्यामुळे इतरांनी निश्चिंत रहावे.
आपली प्रकृती ठिक नसताना आपण लगेचच कामाला सुरुवात करणार का असे विचारले असता, 'कामाची सवय असेल तर स्वस्त बसवत नाही' असे वाक्य खास शैलीत उच्चारत संजय राऊत म्हणाले प्रसारमाध्यमांनी माझ्या प्रकृतीची काळजी करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. माझ्यासाठी डॉक्टरांपेक्षाही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश महत्त्वाचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, शिवसेनेच्या आक्रमक रणनीतीमागे आहे 'हा' चेहरा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांच्याच सल्ल्याचा झाला होता फायदा)
'महाराष्ट्र हे काही मध्यावधी निवडणुकांचे दुकान आहे काय?'
राज्यात मध्यवधी निवडणुकांची चर्चा आहे, असे विचारले असता 'महाराष्ट्र हा काही मध्यवधी निवडणुकांचे दुकान आहे काय?' असा टोलाही राऊत यांनी भाजचे नाव न घेता लगावला आहे.