शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट यांच्या मध्ये शाब्दिक चकमक वाढायला लागली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे मृत्यू प्रकरणी खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आज एकनाथ शिंदेंच्या मागील काही दिवसांमधील वक्तव्यांवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मधून पहिल्यांदाच टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.
ईडी च्या भीतीनेच आमदार, खासदार घाबरून शिंदेंच्या गलबतामध्ये चढले असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. शिंदे-फडणवीस ही जोडी म्हणजे सरकार वाटत असेल तर ते खरोखर विचित्र मनुष्यप्राणी असल्याचं म्हणत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना येनकेन मार्गाने मुख्यमंत्री पद हडपायचं होतं. भाजपा-ईडी युतीने त्यांना या कामासाठी 'समृद्धी' मार्ग दाखवला असल्याचं म्हटलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा शिंदे गट मग राज्यपालांचा हिंदूंमध्ये फूट पाडणारा डाव का हाणून पाडू शकले नाहीत? असा देखील सवाल विचारत आहेत. हे देखील नक्की वाचा: Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: 'ते शिवसैनिक नव्हे, तर दगाबाज मुख्यमंत्री', एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे बरसले.
शिवसेना संपवण्याचा भाजपाचा डाव जुनाच होता. आता त्यांनी ईडी सारख्या यंत्रणांची भीती दाखवत आमदार,खासदार गोळा केले आहेत. दरम्यान त्यांचा शिवसेना संपवण्याचा हा डाव देखील यशस्वी होणार नाही कारण शिवसेना आता नवी उभारी घेत आहे आकाशाला गवसणी घालत आहे. ईडीला घाबरून आमच्याकडे येऊ नका सांगणं म्हणजे दोघांचेही दुकान कायमचं बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू असलेलं दुकान फार काळ चालत नाही. मुख्यमंत्र्यांना ४० आमदारांचे समर्थन आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले,” असे म्हणत शेलक्या भाषेत एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.