Shiv Sena MLA Suresh Gore (Photo Credits: Facebook)

पुण्यातील (Pune) खेड (Khed) तालुक्यातील शिवसेनेचे (Shiv Sena) माजी आमदार सुरेश गोरे (Suresh Gore) यांचे निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.उपचारादरम्यान आज (10 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे.

सुरेश गोरे हे खेड आळंदी मतदारसंघाचे 2014 ते 2019 दरम्यान आमदार होते. तसंच त्यांनी चाकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही भूषवले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना 2009 साली खेडची उमेदवारी देऊ केली होती. मात्र नंतर काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली. दरम्यान, 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरेश गोरे यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच या कठीण प्रसंगात गोरे कुटुंबियांसोबत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पहा ट्विट:

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या कचाट्यात अनेक राजकीय नेते सापडले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मात्र योग्य उपचारानंतर सर्वांना कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक लोकप्रतिनीधींना कोरोनाची लागण झाली आहे.